पुणे | शालेय साहित्य भिजलेल्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोथरुडमधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील धावून गेले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लोकसहभागातून पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या नदीकाठच्या भागात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. कोथरुडमधील एरंडवणा भागातील रजपूत वीटभट्टी आणि खिल्लारे वाडी परिसरात ही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले.
या मुलांच्या शाळा काही महिन्यांपूर्वीच सुरू झाल्याने पालकांनी आपल्या पाल्यांसाठी मोठ्या कष्टाने आणलेले शालेय साहित्य पाण्यात वाहून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, आमदार चंद्रकांत पाटील यांनी या भागातील मुलांना तातडीने पाठ्यपुस्तकांसह शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याने मोठा दिलासा मिळाला.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सरचिटणीस अनुराधा एडके, राज तांबोळी, प्रभाग अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, शिवाजी शेळके, गायत्री लांडे, कुणाल तोंडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.





