शेतकरी व स्थलांतरितांना मदतीचा हात

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयाचे आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी स्थलांतरित कामगार, शेतकरी, पथारीवाले आणि किफायतशीर घर निर्मितीसाठी 3.16 लाख कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
आगामी काळात 25 लाख शेतकऱ्यांना नवी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध केली जाणार आहेत. यावर कमी व्याजदरावर सहज 25 हजार कोटी रुपयाचे कर्ज उपलब्ध होईल. सध्या अडीच कोटी शेतकऱ्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे. त्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी 2 लाख कोटीचे कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध होणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये 63 लाख शेतकऱ्यांना 86 हजार कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 30 हजार कोटी रुपयाचे कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. आगामी काळातही यात वाढ केली जाणार आहे.
8 कोटी स्थलांतरितांना 2 महिने मोफत धान्य
गेल्या दोन महिन्यापासून देशभरात स्थलांतरित मजुरांचा आक्रोश चालू आहे. या स्थलांतरितांना पुढील 2 महिने 5 किलो धान्य, एक किलो डाळ मोफत दिली जाणार आहे. देशभरातील 8 कोटी स्थलांतरितांना याचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर या स्थलांतरितासाठी शहरांमध्ये कमी भाड्यावर घरे उपलब्ध करण्याची योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी3 हजार 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. स्थलांतरितांना देशात कुठही धान्य उपलब्ध व्हावे यासाठी आधार क्रमांक रेशन कार्डची जोडण्याची माहीम एक देश – एक रेशन कार्ड चालू आहे ती लवकरच पूर्ण होईल.
मध्यमवर्गीयांना घरासाठी कमी व्याजदरावर कर्ज
मध्यमवर्गीयांना किफायतशीर दरात घरे उपलब्ध व्हावीत याकरिता केंद्र सरकारने व्याजदरातील सवलतीची योजना सुरू केली होती. आता या योजनेला आणखी एक वर्षासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. 6 लाख ते 18 लाख रुपये उत्पन्न गटातील लोकांसाठी ही योजना असून याकरिता 70 हजार कोटी रुपये उपलब्ध करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. याचा फायदा अडीच लाख कुटुंबांना होईल असे समजले जाते.
पथारी वाल्यासाठी 5 हजार कोटींची योजना
करोना व्हायरसमुळे रस्त्यावर विक्री करणाऱ्या लोकांवर प्रचंड परिणाम झाला आहे. या विक्रेत्याकडून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होतात. मात्र गेल्या दोन महिन्यात त्यांना काम करता आलेले नाही. अशा व्यवसायिकांना 5हजार कोटी रुपयाच्या कर्ज योजनेची घोषणा सीतारामन यांनी केली. यामुळे 50 लाख व्यवसायिकांना 10 हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल उपलब्ध होऊ शकणार आहे.
मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांना व्याजदरात सवलत
छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज योजना सुरू केलेली आहे. यामध्ये कमी कर्ज घेत असलेल्या वर्गाला व्यजात दोन टक्के सवलत दिली जाणार आहे. या योजनेचे नाव मुद्रा शिशू कर्ज योजना असून असे कर्ज घेणारांना 50 हजार रुपयापर्यंतचा लाभ होणार आहे. याकरिता दीड हजार कोटी रुपये उपलब्ध केले असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
रोजगार हमीतील रोजगार वाढविला
लॉक डाऊनमुळे स्थलांतरित कामगार आपल्या गावी परतत आहेत. त्यांना आपल्या गावीही काम मिळावे याकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतचे काम वाढविण्यात आले आहे. गेल्या 2 महिन्यात यासाठी 10 हजार कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले असून त्यामुळे 14.62 कोटी मनुष्यबळ दिवस रोजगार निर्माण झाला आहे. आगामी काळातही स्थलांतरित मजूर जेथे असतील तेथे त्यांना काम उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना संरक्षण
भारतात अनौपचारीक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. स्थलांतरित मजूर याच क्षेत्रात काम करतात. अशा मजुरांसाठी आगामी काळात अनेक उपाययोजना जाहीर केल्या जाणार आहेत. जेणेकरून त्यांना औपचारिक क्षेत्रात येण्यास मदत होईल.हे कामगार औपचारीक क्षेत्रात आल्यानंतर त्यांचा भविष्य निर्वाह निधीची मदत होईल. यासाठी कामगार मंत्रालय तपशीलात योजना तयार करीत असल्याचे सीतारामन म्हणाल्या.





