Fauji Poster : हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन्…; प्रभासचा ‘फौजी’मधील खतरनाक अवतार पाहून चाहते थक्क
Fauji Poster : गांधीजींची शांततेची वाटचाल आणि प्रभासचा हिंसक अवतार यामधून चित्रपटाचे कथानक काय असू शकते याचा वेगवेगळा अंदाज लावला जात आहेत.

Fauji Poster : अभिनेता प्रभासच्या आगामी ‘फौजी’ चित्रपटाचा दमदार फर्स्ट लूक समोर आला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरमध्ये प्रभास अनवाणी पायांनी पुढे जाताना दिसत आहे. अंगावर रक्ताचे डाग असलेले पांढरे बनियान आणि धोतर, तसेच दोन्ही हातात रिव्हॉल्व्हर असा त्याचा लूक पाहायला मिळतो.
चेहऱ्यावरील राग आणि अंगावरील रक्ताचे डाग या पोस्टरमधील अॅक्शनची तीव्रता अधोरेखित करतात. या फर्स्ट लूकमधील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे ऐतिहासिक चारमिनारची पार्श्वभूमी. पोस्टरच्या एका बाजूला शस्त्र हातात घेतलेला प्रभास दिसतो, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधी काठीच्या आधाराने पुढे जाताना दिसत आहेत. गांधीजींची शांततेची वाटचाल आणि प्रभासचा हिंसक अवतार यामधून चित्रपटाचे कथानक काय असू शकते याचा वेगवेगळा अंदाज लावला जात आहेत.
‘फौजी’ची टॅगलाईन ‘A Battalion who Fights Alone’ अशी आहे. या चित्रपटात प्रभास स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महात्मा गांधींची भूमिका नेमका कोणता अभिनेता साकारणार, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील काही न सांगितलेल्या घटनांवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याची चर्चा आहे. ३ डिसेंबर २०२६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हनु राघवपुडी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
प्रभासचा हटके आणि दमदार लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता ‘फौजी’च्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याची कोणती कथा मोठ्या पडद्यावर उलगडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय प्रभासचा स्पिरीट हाही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाच्या चित्रीकरणात तो व्यस्त आहे.





