सहकारात काही लोकांची टोळी कार्यरत

सातारा – सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकाराच्या नावाखाली काय चालते हे उघड आहे. काही लोकांची टोळी सहकारात कार्यरत आहे. जिल्हा उपनिबंधकांचा पेन जड झाल्यामुळे अशा लोकांवर कारवाई होत नाही. कारवाई करण्यासाठी ते टाळाटाळ करत आहेत. असले निष्क्रिय व नकारात्मक दृष्टिकोन असलेले अधिकारी पदावर असतील तर सामान्य लोकांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, अशी रोखठोक टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी धरणालगतची अवैध बांधकामे, बाजार समितीसंदर्भात झालेले आरोप तसेच सातारा शहरातील अतिक्रमणे या विविध विषयांवर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. सातारा बाजार समितीत एपीएमसी पात्र शेतकऱ्यांचे अर्ज पात्र केल्याबद्दल उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “”सहकारामध्ये काहीही चालते. या सहकारात काही लोकांची टोळी कार्यरत आहेत. सातारा मार्केट कमिटीचे उदाहरण घ्या. यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. सगळे उघड असून सगळ्यांना माहित आहे. मनवे या नावाच्या माणसाला निलंबित करण्यात आले आहे तरी तो अजून आहे. त्याच्या बंगल्यात कोण जाऊन राहिले, याचा शोध घ्या.” अपात्र अर्जांविषयाची संपूर्ण जबाबदारी उपनिबंधकांची आहे. लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी कोणालाही पाठीशी घालू नये. कामाचा जडपणा सोडून कारवाई करावी. अधिकारी काम करणार नसतील तर त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात व्यर्थ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उदयनराजे म्हणाले, “धरणाशेजारी असलेली अतिक्रमणे हा गंभीर विषय आहे. यासंदर्भातील बांधकामे कोणतेही अपवाद ठरू नये. गोळीबार मैदानानजीक पूर्वी आमच्याही खाणी होत्या. त्या ठिकाणची वस्ती वाढल्यानंतर आम्ही त्या स्वतःहून बंद केल्या. आम्हाला जे नियम लागू झाले ते सर्वांनाच लागू हवेत.” त्यामुळे अशा कारवाईबाबत कोणताही अपवाद राहता कामा नये, असे सांगत उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांच्या फार्म हाऊस अतिक्रमणावर निशाणा साधला. जिल्हा बॅंकेशी संलग्नित असणाऱ्या सेवा सोसायटीमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे.
त्यासंदर्भात उदयनराजे म्हणाले, “”जिल्हा बॅंकेला ईडीचे पत्र आले. त्यात काय टॉप सिक्रेट आहे? माहिती विचारली असली तरी ते देत नाहीत. काही वर्षांपूर्वी एक महान आमदार जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होते. त्या वेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनवे यांच्या बंगल्यात कोण कोण राहत होते, याचा पत्रकारांनी शोध घ्यावा. ईडीची पत्रे जिल्हा बॅंकेला अशीच येत नाहीत. त्यामागे काहीतरी तर्कसंगत कारण आहे. मात्र, त्याची अजिबात माहिती दिली जात नाही. त्यामुळे पत्रकारांनीच या कारणांचा शोध घ्यावा.” सातारा शहरातील विशेषतः शाळा, महाविद्यालयालगतची अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.





