तळेगावमध्ये भव्य पोतसोहळा रंगला; मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी

तळेगाव ढमढेरे – दसऱ्याच्या निमित्ताने तळेगाव ढमढेरे येथ मुख्य बाजार पेठेत भव्य पोतसोहळा रंगला. तर खंडोबा देवाच्या भेटीसाठी गावातील श्रीनाथ महाराज, श्री सिद्धेश्वर महाराज, उत्तरेश्वर पालखी सायंकाळी 5 वाजता वाजत-गाजत बाजार मैदान मार्गे श्री खंडोबा देवाची भेट घेण्यासाठी मार्गस्थ झाला. यावेळी पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या गावातील नागरिक व भाविक उपस्थित होते.
तर रात्री 8 वाजता तळेगाव ढमढेरे मुख्य वेशीपासून पोत सोहळ्यास सुरुवात झाली. यामध्ये जय तुळजाभवानी पोत सोहळा अखिल होळी मैदान, तुळजा भवानी पोत सोहळा, भवानीमाता पोतसोहळा असे तीन पोत सोहळे संपन्न झाले. पोत पाजळत ढोल तशाच्या गजरात पोत नाचविण्यासाठी युवा पिढी मोठ्या प्रमाणात पुढे सरसावलेली पाहायला मिळाली. बाजारपेठेमार्गे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे चौकापर्यंत हा सोहळा संपन्न झाला. यामध्ये गावातील विविध स्तरातील पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या वेळेत पोतसोहळ्याची सांगता झाली. दिवसा दुर्गामाता देवीची ,सावता नवरात्र उत्सव मंडळ व अखिल होळी मैदान नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीची मिरवणूक सुद्दा ढोल तशाच्या गजरात शांततेत पार पडल्या. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनवले, पोलीस हवालदार अमोल चव्हाण, संदीप कारंडे, आत्माराम तळोले, स्वप्नील गांडेकर, बिट अंमलदार किशोर तेलंग यांनी चोख बंदोबस्त केला.
श्री क्षेत्र तुळजापूर येथे तुळजा भवानी मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमेला 250 वर्षांपासून सोलापूर काठी सोहळ्याच्या पुढे पोत पाजळण्याचा मान तळेगावकरांना आहे. या कार्यक्रमासाठी तळेगाव ढमढेरे येथील भाविक कोजागिरीला तुळजापूरला रवाना होतात, अशी माहिती पोतसोहळ्याचे समन्व्यक बाळासाहेब ढमढेरे यांनी सांगितली.





