तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरल्याने या पदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी नगराध्यक्षा अॅड. रंजना भोसले, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल वाळुंज आणि सौरभ दाभाडे यांनी अर्ज दाखल केले होते. पाचही उमेदवारांचे अर्ज मंजूर झाल्याने मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी एकूण १३४ अर्ज दाखल झाले असून १४ प्रभागांमधील स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने एकत्र मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीमध्ये राष्ट्रवादीला १७ तर भाजपला ११ जागांची वाटणी झाली आहे. मात्र दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या असल्याने अनेकांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांसारख्या पक्षांचेही कट्टर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. हे उमेदवार माघार घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा स्वरूपात रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. २५ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने पुढील काही दिवसांत राजकीय हालचाली, घडामोडी आणि समीकरणे वेगाने बदलण्याची शक्यता आहे.