नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत फूट पडली असून आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे सोमवारी (दि. 28) अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहे. जुन्नर तालुक्यातील 14 नंबर येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसैनिक तुतारीचे काम करण्यास तयार नव्हता, परंतु आघाडी धर्म पाळून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शिवसैनिकांनी विजयी केले. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसैनिकांना विधानसभेच्या निवडणुकीत मानाचे पान दिले जाईल, असे सांगितले होते. परंतु मानाचे पान न देता तोंडाला पाने पुसली असल्याचे शल्य शिवसैनिकांच्या मनात आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवावा याप्रमाणे जुन्नर तालुक्यातील शिवसैनिक विचार करू लागला असल्याचे माऊली खंडागळे यांनी नमूद केले. शेतकरी कुटुंबातील माणसाने मोठे व्हायचे नाही का? असा विचार करण्याची वेळ आता शिवसैनिकांवर आली आहे. निष्ठावान सैनिकांना आजपर्यंत ना आमदार, ना खासदार होण्याची संधी मिळाली. त्यामुळे विधानसभा 2024 ची विधानसभेची निवडणूक लढवून आलेली संधी सोडता कामा नये, असे खंडागळे यांनी निर्धार मेळाव्यात सांगितले. बंडखोर थंड होतात का? विधानसभा निवडणुकीचे खरे चित्र सोमवारी (दि. 4 नोव्हेंबर) स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी व महायुतीत बंडखोरी होत असली तरी पक्षातील वरिष्ठांच्या दबावामुळे बंडखोर थंड होतात का? हे बघावे लागेल. अन्यथा जुन्नर तालुक्यात चौरंगी अथवा पंचरंगी निवडणूक अटळ असल्याचे संकेत मिळत आहे.