राजगडसाठी ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! दिग्गज नेत्यांच्या घरातून महिलांना संधी, तालुक्यात राजकीय खळबळ

प्रभात वृत्तसेवा
वेल्हे – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर वेल्हे (राजगड) तालुक्यात बाळासाहेब ठाकरे गटाने (शिवसेना) संभाव्य उमेदवार जाहीर करत मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. पक्षाकडून जाहीर झालेल्या यादीत युवाशक्ती आणि महिला नेतृत्वावर विशेष भर देण्यात आला आहे. विशेषतः, शिवसेनेतील (ठाकरे गट) अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांच्या पत्नी व सुनांना उमेदवारी देऊन पक्ष नेतृत्वाने तालुक्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.
पंचायत समितीच्या गणांमध्ये महिला उमेदवारांना संधी दिली आहे. ज्यामुळे तालुक्याच्या राजकारणाची समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. पानशेत गणात माजी तालुका प्रमुख, दत्ता भाऊ जागडे यांच्या सुनबाई अंजली केदार जागडे यांना उमेदवारी मिळाली आहे, तर याच गणातील दुसऱ्या जागेसाठी माजी तालुका प्रमुख राजेश निवगुणे यांच्या पत्नी मनीषाताई राजेश निवगुने यांना मैदानात उतरवले आहे.
वेल्हे बुद्रुक गणात युवासेना तालुका प्रमुख अनिल पारठे यांच्या वहिनी वैशाली विशाल पारठे यांना संधी मिळाली आहे. या दोन गणांमध्ये दोन-दोन मोठ्या नेत्यांच्या कुटुंबातील महिलांना उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेने (ठाकरे गट) महिलांना सक्षम नेतृत्व म्हणून पुढे आणल्याचे स्पष्ट होत आहे.
जुन्या-नव्या नेतृत्वाचा समन्वय..
उमेदवार यादीत जुने, अनुभवी, तरुण, सक्रिय कार्यकर्त्यांचा समन्वय साधला आहे. वांगणी गणातून सक्रिय, जुने कार्यकर्ते उमेश काळूराम नलावडे (शिवसेना तालुका प्रमुख) यांना उमेदवारी दिली आहे. विंझर गण (पंचायत समिती) येथून शिवसेना उप तालुका प्रमुख गोपीनाथ राणवडे यांना मैदानात उतरवले आहे. जिल्हा परिषद वांगणी गट येथून शिवसेना उप जिल्हा प्रमुख शैलेश अनंतराव वालगुडे यांच्या रूपात एक मोठा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. विंझर पानशेत जिल्हा परिषद गटात ज्येष्ठ आणि माजी तालुका प्रमुख बाळासाहेब देशपांडे हे उमेदवार असतील.




