Pune District : ३० गुंठ्यांत गोल्डन बेरीचा सोन्यासारखा प्रयोग
Pune District : चार बाय दोन फूट अंतरावर रोपांची लागवड केली असून, त्यासाठी सुमारे 80 हजार रुपये खर्च आला आहे.लहान आकाराचे, पिवळसर-नारिंगी रंगाचे आणि गोड-आंबट चवीचे हे फळ आरोग्यदायी गुणधर्मांमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

आळेफाटा : शेती म्हणजे केवळ ऊस, कांदा, टोमॅटो आणि भाजीपाला, हे समीकरण बदलण्याची गरज आता जाणवू लागली आहे. बाजारपेठेचा कल ओळखून वेगळ्या पिकांची निवड केल्यास कमी क्षेत्रातही उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होऊ शकतो, हे बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील उच्चशिक्षित महिला शेतकरी पुष्पा अमोल कोरडे यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले आहे.
त्यांनी अवघ्या 30 गुंठे क्षेत्रात रासबेरी अर्थात ‘गोल्डन बेरी’ची लागवड केली असून, या पिकातून तीन टन उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे, सध्या या फळाला प्रतिकिलो 240 ते 250 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने त्यांच्या प्रयोगाकडे परिसरातील शेतकर्यांचे लक्ष वेधले गेले आहे. पारंपरिक पिकांच्या चक्रातून बाहेर पडत काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने कोरडे यांनी गोल्डन बेरी या नावीन्यपूर्ण फळपिकाची निवड केली. कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील कृषी तंत्रज्ञ भरत टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दोन रुपये प्रतिरोप या दराने चार हजार रोपे खरेदी केली.
चार बाय दोन फूट अंतरावर रोपांची लागवड केली असून, त्यासाठी सुमारे 80 हजार रुपये खर्च आला आहे.लहान आकाराचे, पिवळसर-नारिंगी रंगाचे आणि गोड-आंबट चवीचे हे फळ आरोग्यदायी गुणधर्मांमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. मुंबईतील वाशी बाजारपेठेत या फळाला मागणी निर्माण झाली आहे. सध्या प्रतिकिलो 240 ते 250 रुपये दर मिळत असून, काढणीनंतर दोन आणि पाच किलोच्या पॅकिंगमधून फळांची विक्री करण्याचे नियोजन कोरडे यांनी केले आहे.
शेतीसोबत पूरक उपक्रमांवरही भर
पुष्पा कोरडे यांचा हा पहिलाच नावीन्यपूर्ण प्रयोग नाही. जिजामाता कृषिभूषण आणि महिला किसान पुरस्काराने सन्मानित झालेल्या कोरडे शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करीत असतात. गोठा व्यवस्थापन, गोबरगॅस, गांडूळ खतनिर्मिती, स्लरी तसेच गोमयापासून विविध उत्पादने तयार करण्यावरही त्यांचा भर आहे. या प्रयोगांसाठी पती अमोल कोरडे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे.
बदलत्या शेतीची नवी दिशा!
एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना पारंपरिक पिकांच्या बाजारभावात चढ-उतार होत आहेत. अशा परिस्थितीत गोल्डन बेरीसारखी नवीन फळपिके शेतकर्यांसमोर पर्यायी संधी निर्माण करीत आहेत. मात्र, केवळ बाजारभाव पाहून लागवड न करता उत्पादन क्षमता, विक्री व्यवस्था, वाहतूक आणि बाजारपेठेतील मागणी यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. बोरी बुद्रुक येथील पुष्पा कोरडे यांचा प्रयोग बदलत्या शेतीची दिशा दाखविणारे एक वेगळे पाऊल ठरत आहे.
शेतकर्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता बाजारपेठेचा अभ्यास करून नवीन पिकांचे प्रयोग करावेत. लागवडीपूर्वी जमिनीची तपासणी, सेंद्रिय खतांचा वापर आणि पिकाला आवश्यक असलेल्या सुधारित तंत्रज्ञानाचे नियोजन केल्यास कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी आहे.
-पुष्पा कोरडे, प्रयोगशील शेतकरी





