माणुसकीचे दर्शन! हरवलेल्या चिमुकलीला कडेवर घेऊन आरपीएफ जवानाची धावाधाव; आई वडील समोर येताच…

Pune : पुणे रेल्वेस्थानक. अत्यंत गजबजलेले ठिकाण. येथे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची रीघ लागलेली असते. येत्या काही दिवसांमध्ये मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे गावी जाण्यासाठी प्रवाशांची लगबग पाहायला मिळत आहे. गर्दीत अनेकजण बेपत्ता झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रेल्वे स्थानकात झालेल्या गर्दीत एक चमुकली बेपत्ता झाली होती. स्थानकात कर्तव्य बजावत असलेल्या एका आरपीएफ जवानाला तीन वर्षांची मुलगी मिळाली. जवानाने धावपळ करुन तीन वर्षांच्या ग्यानवीला तिच्या आई वडिलांच्या हवाली केले आहे. या जवानाचे नाव संतोष जायभाये असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
उन्हाळी सुट्यांमुळे पुणे रेल्वे स्थानकावर झालेली गर्दी अन् त्यात तीन वर्षांची चिमुकली ‘ग्यानवी’ हरवली. यामुळे येथे प्लॅटफॉर्म एकवर दाखल झालेल्या प्रवाशांची चर्चा अन् गर्दी जमली होती. गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवान संतोष जायभाये यांच्या हे निदर्शनास आले. हरवलेल्या तीन वर्षांच्या ‘ग्यानवी’चा रडका चेहरा पाहून तेही गहिवरले. लगेच त्यांनी तिला उचलून कडेवर घेतले आणि पुणे रेल्वे स्थानकावरील सहाही प्लॅटफॉर्मवर तिच्या आई-वडिलांना शोधण्यासाठी धावाधाव सुरू केली. तब्बल अर्धा तास धावपळ करून शोध घेतल्यावर अखेर ग्यानवीचे आई-वडील सापडले. जायभाये यांनी तिला तिच्या आई- वडिलांकडे सुपूर्त केले.
ग्यानवीच्या आई वडिलांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. आरपीफ जवानाच्या सतर्कतेमुळे तातडीने ग्यानवीला तिच्या आई वडिलांकडे सूपर्त करण्यात आले. आरपीएफ जवान संतोष जायभाये यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्यामुळे माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दिसले.





