धक्कादायक… ! बीडमध्ये पाचवीत शिकणाऱ्या मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह; पहिला नवरा पसार, दुसऱ्याला अटक

बीड : बीड शहरातील शाहूनगर परिसरात एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या दोन विवाहांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पाचवी उत्तीर्ण झालेल्या या मुलीचा पहिला विवाह ३२ वर्षीय पुरुषासोबत लावण्यात आला, परंतु त्याच्या पहिल्या पत्नीला ही बाब समजताच तो पळून गेला.
त्यानंतर लगेचच दुसऱ्या व्यक्तीसोबत तिचा विवाह लावला गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दुसऱ्या नवरदेवाला पळून जाताना रस्त्यावर अटक केली. सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली. मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले. पहिला विवाह 32 वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला. तो विवाह झाला देखील, मात्र या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली.
त्यामुळे त्याने तिथून पळ काढला. या नंतर लागलीच दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलविण्यात आला आणि त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला. याची माहिती प्रशासनाला मिळताच, पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर अडवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
परभणीत भरदिवसा घरफोडी; १६ लाखांचा ऐवज लंपास
परभणीच्या पाथरी तालुक्यातील माळीवाडा परिसरात साहेबराव मनोलीकर यांच्या कुटुंबाने सासूबाईंच्या अंत्यविधीसाठी घर सोडलेले असताना चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या घरात चोरी केली. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ लाखांचे दागिने आणि १ लाख रुपये रोख असा १६ लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेने परभणीत भीतीचे वातावरण पसरले आहे. पाथरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, डॉग स्कॉडच्या मदतीने अधिक कसोशीने चौकशी सुरू आहे.





