Om Puri : खडतर प्रवासात मित्राची साथ लाभली; ‘अर्धसत्य’मधील अभिनयाने मिळाली लोकप्रियता, मोठ्या संघर्षातून घडला ओम पुरींचा अभिनय प्रवास….
Om Puri : ओम पुरी यांना अभिनय क्षेत्रातच करिअर करायचे होते. या स्वप्नाचा पाठपुरावा करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नाटकांमधून अभिनयाची सुरुवात करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

Om Puri : बॉलिवूडमधील समांतर सिनेमाला आपल्या दमदार अभिनयाने नवी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर नाव आहे. व्यक्तिरेखेच्या बाह्य रूपापेक्षा तिच्या भावविश्वाला महत्त्व देत त्यांनी अनेक भूमिका जिवंत केल्या. गंभीर आशयाच्या चित्रपटांपासून ते विनोदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांचा भारदस्त आवाज, संवादफेक आणि सहजसुंदर अभिनय ही त्यांची खास ओळख होती. मात्र, या यशामागे संघर्ष, मेहनत आणि अभिनयावरील अपार प्रेम दडलेले होते.
ओम पुरी यांना अभिनय क्षेत्रातच करिअर करायचे होते. या स्वप्नाचा पाठपुरावा करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नाटकांमधून अभिनयाची सुरुवात करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. पुढे ‘अर्धसत्य’ या चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीने नवे वळण घेतले.
जन्मतारखेबाबतचा रंजक किस्सा
ओम पुरी यांच्या जन्मतारखेबाबत एक खास किस्सा सांगितला जातो. त्यांना स्वतःची अचूक जन्मतारीख माहीत नव्हती. शालेय वयात त्यांच्या काकांनी शाळेच्या नोंदींसाठी ९ मार्च १९५० ही तारीख लिहून दिली होती. ओम पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या आईने त्यांचा जन्म दसऱ्याच्या दोन दिवस आधी झाल्याचे सांगितले होते. १९५० च्या कॅलेंडरचा आधार घेत त्यांनी १८ ऑक्टोबर ही तारीख स्वीकारली. त्यानंतर त्यांची जन्मतारीख १८ ऑक्टोबर १९५० अशी नोंदवली गेली. त्यांचा जन्म पंजाबमधील पतियाळा येथे झाला होता.
आर्थिक अडचणींवर मात करत अभिनयाचा ध्यास
ओम पुरी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना लहानपणीच कष्ट करावे लागले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी ढाब्यावरही काम केले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीने त्यांच्यातील कलाकाराला कधीच थांबवले नाही. महाविद्यालयीन जीवनात त्यांची नाटकांमधील रुची वाढली. नाट्यगटात सहभागी होत त्यांनी अभिनयाचा अनुभव घेतला आणि याच आवडीने त्यांना पुढे चित्रपटसृष्टीकडे नेले.
अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) येथे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथेही त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पुढील वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रवासात नसीरुद्दीन शाह यांची मैत्री आणि मदत महत्त्वाची ठरली.
नसीरुद्दीन शाह यांच्याशी खास मैत्री
ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांची मैत्री हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय मैत्रींपैकी एक मानली जाते. अभिनयाविषयीची समान आवड आणि संघर्षाचे अनुभव यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. FTII मध्ये प्रवेश घेण्याच्या प्रयत्नात असताना ओम पुरी यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा वेळी नसीरुद्दीन शाह यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि मदतही केली.
या मैत्रीशी संबंधित एक किस्सा विशेष चर्चेत असतो. FTII च्या मुलाखतीसाठी जाताना ओम पुरी यांच्याकडे घालण्यासाठी चांगला शर्ट नव्हता. तेव्हा नसीरुद्दीन शाह यांनी त्यांना स्वतःचा शर्ट दिल्याचे सांगितले जाते. हा प्रसंग त्यांच्या मैत्रीतील आपुलकी दाखवतोच; पण प्रतिभा असूनही त्या काळात कलाकारांना कोणत्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता, याचीही जाणीव करून देतो.
‘अर्धसत्य’ने मिळवून दिली खरी ओळख
ओम पुरी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घासीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर १९८० मध्ये आलेल्या ‘आक्रोश’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप पाडली.
मात्र, १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अर्धसत्य’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. व्यवस्थेतील भ्रष्टाचार, सामाजिक वास्तव आणि एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याचा अंतर्गत संघर्ष यांचे प्रभावी चित्रण त्यांनी या चित्रपटात केले. त्यांच्या अभिनयातील वास्तववादाने प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
यानंतर ‘आरोहण’, ‘माचिस’, ‘गुप्त’, ‘धूप’, ‘जाने भी दो यारों’ आणि ‘हेरा फेरी’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची विविध रूपे दाखवली. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही काम केले. ‘सिटी ऑफ जॉय’, ‘वुल्फ’, ‘ईस्ट इज ईस्ट’ आणि ‘द घोस्ट अँड द डार्कनेस’ यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
गंभीर भूमिकांपासून विनोदी अभिनयापर्यंत
ओम पुरी यांची ओळख केवळ गंभीर आणि वास्तववादी भूमिका साकारणारा अभिनेता अशी मर्यादित नव्हती. विनोदी भूमिकांमध्येही त्यांनी तितकीच सहजता आणि ताकद दाखवली. ‘हेरा फेरी’ आणि ‘चाची ४२०’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘जाने भी दो यारों’सारख्या चित्रपटातूनही त्यांच्या अभिनयातील वेगळेपण अधोरेखित झाले.
१९८८ मध्ये दूरदर्शनवरील ‘भारत एक खोज’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी विविध भूमिका साकारल्या. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी पंजाबी, मराठी, गुजराती, उर्दू आणि दक्षिण भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले. त्यामुळे त्यांची अभिनयाची कारकीर्द भाषांच्या आणि चित्रपटप्रकारांच्या सीमा ओलांडणारी ठरली.
ओम पुरी यांच्या अभिनयाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिरेखेला दिलेले वास्तववादी रूप. पडद्यावर स्वतःचे व्यक्तिमत्त्व ठसवण्यापेक्षा त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव, तिच्या भावना आणि तिचा संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा भर असे. त्यामुळेच त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
वैयक्तिक आयुष्य
ओम पुरी यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. त्यांनी प्रथम सीमा कपूर यांच्याशी विवाह केला. त्यानंतर नंदिता पुरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना ईशान हा मुलगा आहे.
६ जानेवारी २०१७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी ओम पुरी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान आणि बहुआयामी अभिनेता गमावला. मात्र, त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचा भारदस्त आवाज आणि अभिनयातील सहजता आजही रसिकांच्या मनात जिवंत आहे.







