ओढ्यात आला नोटांचा पूर ! सांगलीतील सुख ओढ्यात वाहात आल्या 500च्या नोटा; Video व्हायरल…

सांगली – सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये असलेल्या सुख ओढ्यात पाचशे रुपयांचा नोटा वाहात असल्याचा आश्चर्यकारक प्रकार शनिवारी घडला. या प्रकारानंतर काही जणांनी थेट ओढ्यामध्ये उतरून या भिजलेल्या नोटा गोळा केल्या.
या नोटा ओढ्यामध्ये नक्की कशा आल्या, याबद्दल माहिती मिळालेली नाही. पण ओढ्यात पाचशे रुपयांच्या नोटा आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा पाहायला मिळाला. या प्रकरणी आटपाडी पोलिस तपास करीत आहेत.
आटपाडीमध्ये अंबाबाई मंदिरालगतच्या ओढ्यातून तेथील बाजार पटांगणाकडे येणाऱ्या ओढ्याच्या पाण्यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटा वाहात असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यानंतर ही बातमी तिथे वाऱ्यासारखी पसरली.
गेल्या काही दिवसांमध्ये अचानक येणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ओढ्याला सध्या पाणी आहे. त्यात पाचशे रुपयांच्या नोटा आढळल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर स्थानिकांच्या तोंडावर आनंदाचे भाव उमटल्याचे पाहायला मिळाले.
ओढ्याच्या पाण्यात पाचशेच्या नोटा आल्याने ते बघण्यासाठी आणि वाहत्या पाण्यात हात धुवून घेण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली. काहींनी या नोटा गोळा करून खिशात घातल्या. हा प्रकार काही सजग नागरिकांनी लगेचच मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
या घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरिकांनी तेथून काढता पाय घेतला. आटपाडी पोलिस या पाचशेच्या नोटा ओढ्यामध्ये कशा वाहत आल्या याबाबत अधिक तपास करीत आहेत. यामागे काही षडयंत्र आहे का किंवा हा चोरीचा पैसा आहे याचाही तपास पोलिस करीत आहेत.





