पुणे जिल्हा | सणसवाडीत किराणा मालाच्या गोडावूनला आग

शिक्रापूर, (वार्तौहर)- सणसवाडी (ता. शिरुर) येथे मागील आठवड्यात एका हॉटेलसह बेकारीला भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ही घटना ताजी असताना पुन्हा सणसवाडीत एका किराणा मालाच्या गोडावूनला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दोन जळीतकांडाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
सणसवाडी येथे उमेश खराबे यांचे किराणा माल व मेडिकल साहित्य पुरविणाऱ्या वस्तूंचे गोडावून असून सायंकाळच्या सुमारास खराबे गोडावून बंद करुन घरी गेलेले असताना पहाटेच्या सुमरास गोडावून मधून धूर येत असल्याचे शेजारील नागरिकांना दिसले. याबाबतची माहिती मिळताच उमेश खराबे यांनी घटनास्थळी धाव घेत गोडावूनमध्ये लागलेली आग नागरिकांच्या मदतीने आटोक्यात आणली.
दरम्यान, लागलेल्या आगीमध्ये गोडावूनमधील किराणा व मेडिकल साहित्य जाळून खाक झाल्याने तब्बल अडिच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत उमेश अर्जुन खराबे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहे.




