एकाच क्षणात सगळं संपलं.! ट्रकच्या धडकेत वडील आणि दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; बारामती हादरवणारी घटना

बारामती : शहरातील खंडोबानगर चौकात हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवरील वडील व दोन मुलींचा दुर्देवी अंत झाला आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिस निरिक्षक विलास नाळे यांनी दिली.
खंडोबानगरच्या चौकात दुचाकीवरुन ओंकार राजेंद्र आचार्य हे आपल्या दोन मुलींसह (क्रमांक एमएच 42- बी-4844) निघाले होते, हायवा ट्रकची (क्रमांक एमएच 16- सीए-0212) त्यांच्या मोटारसायकलला धडक बसली. यात हायवा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी सई ओंकार आचार्य (वय अंदाजे 11 वर्षे) व मधुरा ओंकार आचार्य (वय 5 वर्षे) यांचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासत असून, ट्रक चालक दशरथ दत्तात्रय डोळे (रा. भिलारवाडी तालुका करमाळा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील खंडोबानगर चौकात भरदुपारी हा अपघात झाल्यानंतर तेथे मोठी गर्दी झाली होती.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात पाठविले. अपघाताच्या ठिकाणचे दृश्य हृदयद्रावक होते. एकाच वेळेस वडील व दोन्ही छोटया मुलींचा दुर्देवी मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. हे तिघे हायवाच्या चाकाखाली नेमके कसे आले याचा पोलिस आता तपास करत आहेत.





