शेतकरीपुत्राला न्यायालयामुळे देशसेवेची संधी मिळणार; पायावरील चट्टा नोकरीसाठी ठरत होता अडथळा

नागपूर : मनात देशसेवेची भावना आणि जिद्दीपुढे अखेर केंद्रीय राखीव पोलीस बलाचे चालले नाही आणि शेतकरी पुत्राला न्यायालयाच्या माध्यमातून देशसेवेच्या संधीचा मार्ग मोकळा झाला. शरीरावर जन्मत: डाग आहे असे कारण पुढे करत केंद्रीय राखीव पोलीस बलाने शेतकरी पुत्राचा अर्ज नाकारला होता. मात्र खामगाव येथील रहिवासी शेतकरी पुत्र खचला नाही. त्याने केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निश्चय केला. सिद्धांत तायडे असं या शेतकरी पुत्राचे नांव आहे.
न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्धांतला सीआरपीएफमध्ये नोकरी मिळणार आहे. त्याच्या पायावरील जन्मजात पांढऱ्या चट्ट्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते, मात्र न्यायालयाने हा निर्णय फेटाळून लावला आहे. सिद्धांत यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून अर्ज केला होता. लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी उत्तीर्ण केल्यानंतर एम्सच्या वैद्यकीय तपासणी अहवालात त्यांच्या पायावरील पांढऱ्या चट्ट्याचा उल्लेख करून त्यांना २६ ऑक्टोबर २०२४ रोजी अपात्र ठरवण्यात आले.
न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी दरम्यान, सिद्धांत यांचे वकील अॅड. स्वप्निल वानखेडे यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या ‘अशोक दुखिया’ प्रकरणातील निर्णयाचा दाखला दिला. या प्रकरणात शरीरावरील जन्मजात डागामुळे उमेदवाराला सशस्त्र दलाच्या नोकरीसाठी अपात्र ठरवता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालानुसार सिद्धांत यांच्या पायावरील चट्ट्यामुळे दैनंदिन कर्तव्य पार पाडण्यात कोणताही अडथळा येत नाही. न्यायालयाने सीआरपीएफला दुसरी कोणतीही अडचण नसल्यास सिद्धांत यांना कॉन्स्टेबल पदी नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत.





