पुणे जिल्हा | थेऊर येथील शेतकरी कन्या बनली पोलीस उपनिरीक्षक

थेऊर, (वार्ताहर) – जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. हे थेऊर येथील शेतकरी ज्ञानेश्वर चंद यांची कन्या गायत्री हिने सिद्ध करून दाखविले आहे. गायत्रीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर गगनभरारी घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन 2024 साली पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आयोगाच्या वतीने बुधवारी (1 ऑगस्ट) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत गायत्री चंद यांनी उत्तीर्ण होऊन गरुडझेप घेतली आहे. गायत्रीचे वडील ज्ञानेश्वर चंद यांची थेऊर परिसरात शेती आहे.
शेतीवर चंद कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकला जातो. गायत्रीची आई पुष्पा या गृहिणी आहेत. ज्ञानेश्वर चंद यांना गायत्री, गीता, वैष्णवी या तीन मुली व मुलगा सिद्धेश्वर अशी अपत्ये आहेत. गायत्रीने लहानपणीच आपण मोठे अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेत काम करावे, असे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न गायत्रीला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतर गायत्रीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सन 2020 साली करण्यास सुरवात केली.
गायत्रीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. परंतु यशाचा रस्ता थोडासा खडतर होता. अंतिम यश हे थोड्या थोड्या गुणांनी हूलकावणी देत होते. मात्र गायत्री अपयशाने खचली नाही. जिद्द, मेहनत, संयम, चिकाटीच्या जोरावर पुन्हा जोरदार अभ्यास केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे.
या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील, बहिण व मित्रपरिवार आहेत. या सर्वांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे यश मी त्यांना समर्पित करतो. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, त्या अपयशाला अभ्यासाच्या परिश्रमाची जोड द्या. त्यानंतर तुम्हीही यशाचे शिखर गाठून नक्की अधिकारी बनू शकता. -गायत्री चंद, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण




