Mirzapur : ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी डबल धमाका.! सिनेमाचा दुसरा भाग अन् वेब सीरिजचा चौथा सीझन येणार; मुख्य अभिनेत्रीने दिली हिंट
'मिर्झापूर सीझन ४'ची. त्यातच 'गोलू गुप्ता'ची भूमिका साकारणाऱ्या श्वेता त्रिपाठी शर्मा हिने सीझन ४ संदर्भात दिलेल्या अपडेटमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Mirzapur : बंदुकींच्या फैरी, रक्तरंजित सत्तासंघर्ष, धक्कादायक ट्विस्ट आणि अंगावर काटा आणणारे संवाद… ‘मिर्झापूर’ म्हटलं की या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. ओटीटीच्या दुनियेत आपल्या वेगळ्या अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या क्राइम-थ्रिलर फ्रँचायझीची क्रेझ आजही कायम आहे.
तीन सीझननंतर आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती ‘मिर्झापूर सीझन ४’ची. त्यातच ‘गोलू गुप्ता’ची भूमिका साकारणाऱ्या श्वेता त्रिपाठी शर्मा हिने सीझन ४ संदर्भात दिलेल्या अपडेटमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘मिर्झापूर’च्या विश्वात सध्या मोठी घडामोड सुरू आहे. वेब सीरिजमधील लोकप्रिय पात्रांना मोठ्या पडद्यावर घेऊन आलेला ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. गुरमीत सिंह दिग्दर्शित या सिनेमात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी शर्मा आणि श्रिया पिळगांवकर यांच्यासह अनेक कलाकार झळकले आहेत.
सीझन ४साठी पटकथेवर काम सुरू!
या सगळ्या चर्चेदरम्यान आता ‘मिर्झापूर’ सीझन ४बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मालिकेत गोलू गुप्ता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या श्वेता त्रिपाठी शर्माने SCREENला दिलेल्या मुलाखतीत सीझन ४च्या कामाबाबत माहिती दिली आहे.
श्वेताच्या म्हणण्यानुसार, सध्या ‘मिर्झापूर’च्या पुढील चित्रपटावरही काम सुरू असून सीझन ४च्या पटकथेवरही काम सुरू आहे. त्यामुळे ‘मिर्झापूर’चा प्रवास आणखी पुढे जाणार असल्याचे तिच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. तिने या संपूर्ण फ्रँचायझीच्या दीर्घ प्रवासाचा उल्लेख करत गोलू आणि कलाकारांच्या वयातील फरकाबाबतही मजेशीर भाष्य केलं.
श्वेताने सांगितले की, ‘मिर्झापूर’चा प्रवास दहा वर्षांहून अधिक काळाचा असू शकतो; मात्र गोलूच्या व्यक्तिरेखेच्या जगात तिचं वय अजूनही तितकंच आहे. म्हणजेच प्रेक्षकांसाठी वर्षं पुढे सरकत असली, तरी कथानकातील गोलू ज्या वयात होती, त्याच कालखंडात तिची व्यक्तिरेखा कायम आहे.






