सर्वपक्षीय आमदारांसाठी शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी सहभोजनाचे आयोजन; नितीन गडकरींचीही उपस्थिती

नवी दिल्ली : दिल्लीत काल सर्वपक्षाचे आमदार एकाच ठिकाणी पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक आमदार जेवणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जमले होते. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Union Minister Nitin Gadkari, Shiv Sena leader Sanjay Raut & Maharashtra MLAs (of any party) reach NCP leader Sharad Pawar’s residence for dinner. pic.twitter.com/bA54cQUTcf
— ANI (@ANI) April 5, 2022
दरम्यान, या स्नेहभोजनाच्या अगोदर महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी चहापानाचा आस्वाद घेतला. संसदेत सर्व पक्षांचे आमदार प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जमले होते. त्यानिमित्ताने शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना रात्री आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते.
पहिल्यांदाच आमदार झालेल्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन संसदेतर्फे करण्यात आले होते. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असलेले महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांना लोकसभेच्या सचिवालयाने पाच आणि सहा एप्रिल रोजी होणाऱ्या दोन दिवसीय अभिमुखता कार्यक्रमासाठी दिल्लीला बोलावले आहे. हेच निमित्त साधून आम्हीही सहभोजन आयोजित केले आहे. या दोन्ही भेटी केवळ सदिच्छा भेटी असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.




