‘बन्सी काहेको बजायी’ मधील चंद्रवती स्त्रीचं एक वेगळं रुप

स्वातंत्र्यपूर्वकाळातील मध्य प्रदेशमधल्या सारंगपूर या गावच्या पारंपरिक कर्मठ वातावरणात “बन्सी काहेको बजायी’ या निर्मला देशपांडे यांच्या कादंबरीचं कथानक हळूहळू पुढे सरकतं आणि वाचकाला वेगळ्या प्रकारची अस्वस्थता प्रदान करून 176 पानात संपतं.
चंद्रावती खऱ्या अर्थाने या कादंबरीची नायिका. काहीशी बंडखोर, अलवार मनाची, माणसाच्या मनातल्या अस्वस्थतेची जाण असणारी, प्रसंगी घुसमट सहन करणारी तर प्रसंगी घुसमट झुगारून देणारी. षोडश वयातून तारूण्याकडे वाटचाल करणाऱ्या या नायिकेचे अलवार चित्र या कादंबरीमध्ये उभे राहते आणि वाचक त्यात नकळतपणे गुंतून पडतो, हा अनुभव सुखकारक ठरतो.
चंद्रावतीचे वडील डॉक्टर चौबळ. सारंगपूरच्या संस्थानच्या राजाचे मुख्य डॉक्टर. तेथील दवाखान्याशिवाय राजघराण्यातील लोकांच्या वैद्यकीय उपचारांची सर्व जबाबदारी डॉक्टर चौबळांवर. चौबळांच्या घरात डॉक्टरांशिवाय त्यांची पत्नी म्हणजे चंद्रावतीची आई जानकीबाई, धाकटा भाऊ शेखर, नोकर सिकत्तर उर्फ बालकदास, रामरतन तांगेवाला.
सध्या चंद्रावती जेथे राहते, तो अगदी ऐसपैस बंगला, चंद्रावतीच्या जन्मानंतर डॉक्टरांनी बांधला. सारंगपूरच्या महाराजांनी दवाखान्याच्या परिसरात नाममात्र दराने हा प्लॉट डॉक्टरांना दिला आणि त्यावर डॉक्टरांनी ही वास्तू उभी केली. चौबळ कुटुंब बंगल्यात राहावयास आले तेव्हा चंद्रावती दोन वर्षांची होती.
सारंगपुरात शिक्षणाच्या सोयींची तशी बोंबच. मोठ्या खटपटीनंतर मुलींची शाळा सुरू झाली. मिस जोहरी यांच्या प्रयत्नांनी मॅट्रीकपर्यंतचे वर्ग सुरू झाले.
चंद्रावतीचे काका इंदोरला, मोठे मामा सुरतला, धाकटे मामा मुंबईला. यापैकी कोणाकडेही कॉलेजला ती जाऊ शकत असते पण तिला मुंबईच्या मुक्त वातावरणात शिकायचे आहे. चंद्रावतीला वाचण्याची आवड आहे. गावातील त्यांच्याच जातीचा लग्नाळू तरुण दिनकर तिला पुस्तके आणून देतो. त्याच्या मनात चंद्रावतीशी लग्न करण्याची इच्छा आहे.
चंद्रावतीच्या बंगल्याच्या पाठीमागचे आवार ओलांडले की बडेबाबूजींचे घर आहे. बडेबाबू सारंगपूर संस्थानच्या दवाखान्याचे सुपरिटेंडेंट असतात. त्यांचे मोठे भाऊ दद्दा चंबळखोऱ्यातले गुंड. त्यांची बडेबाबूंच्या घरात दहशत. दद्दा आले की सगळीकडे चडीचूप गडीगूप. बडेबाबूंच्या घरात त्यांची पत्नी सत्वंती आणि जामुनी-मिथला या दोन गोंडस मुली. चंद्रावतीचे काय आणि जामुनी-मिथलाचे काय दोन्ही घरं अत्यंत कर्मठ विचारसरणीची. पण दोन्ही घरात अत्यंत कौटुंबिक संबंध.
दोन्ही घरात काही वेगळा पदार्थ शिजला वा तयार झाला की एकमेकांकडे पोहचलाच म्हणून समजायचा. चंद्रावतीचं या दोन्ही मुलींवर खूप प्रेम. सत्वंतीकाकीचं चौबळांकडे नेहमी येणंजाणं. जामुनीचं पाळण्यातलं नाव रुपमती. रुपमतीचं झाले रुब्बती. पण तिच्या जांभळ्या रंगाच्या ओठांच्या महिरपीवरून तिला चंद्रावती “जामुनी’ म्हणायला लागली आणि पुढे तेच नाव कायमचं चिटकलं. बडेबाबूंचे सारंगपूरला येणे त्यांच्या दद्दाला पसंत नसते. पण जामुनीच्या जन्मानंतर ते येऊ जाऊ लागतात.
घराच्या पाठीमागच्या आवारातल्या झाडांची फुलं सकाळी तोडण्याची चंद्रावतीला सवय आहे. सारंगपूरला उन्हाळा खूप असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात मेंदीची पाने कुटून सगळ्या पोरांना लावण्याची दोन्ही घरात पद्धत. जांभळाच्या झाडाखाली बांधलेला झुला पोरांना खूप आवडतो. पाच सहा महिन्यांपासून महाराजांचे चिरंजीव रावराजे यांची स्वारी घोड्यावरून वा मोटारीतून बागेच्या बाजूच्या रस्त्यावरून संध्याकाळी त्यांच्या मित्रासोबत जाते. शिवाय भल्या पहाटे घोड्यांच्या टापांचा आवाज आला की चंद्रावती उठते, दोन चुळा भरून देव्हाऱ्याजवळची पितळी परडी उचलून हळूच जानकीबाईंच्या देवपूजेसाठी फुले खुडायला बागेत येते. कधी कधी बंगल्याच्या फाटकापाशी घोड्यांचे लगाम सैल होतात. चाल मंदावते. चंद्रावती झाडाआड होते. हे असे नेहमीचेच.
एक दिवस कोरीव मिशांचा सावळ्या रंगाचा ऐटबाज तरुण चंद्रावतीसमोर उभा ठाकतो. “डॉक्टरसाहेब आहेत का’ हे विचारत. त्याचे नाव विश्वास पवार. सरदार खासेसाहेब पवारांचा मुलगा. भरपूर पैसेवाला, गडगंज संपत्ती असणारा. चंद्रावतीला त्याने अनेकवेळा कुठेकुठे पाहिलेले असते. विश्वासची भाषा अशुद्ध, काहीसा अहंकारी. मॅट्रीकला असणारी चंद्रावती त्याला आवडलेली असते आणि पहिल्याच भेटीत विश्वासही चंद्रावतीच्या मनात काही वेगळीच भावना निर्माण करतो. रावराजेंसोबत कॅम्पेनियन म्हणून सध्या विश्वासची नियुक्ती झालेली असते. “पहाटे आपलं दर्शन झालं की आमचा दिवस चांगला जातो’ असं विश्वासने म्हटल्यावर चंद्रावती लाजते आणि तिच्या आयुष्याला विश्वासरूपी नवीन पान चिटकते. विश्वासचे तांबूस डोळे, एक भुवई उंचावून बोलण्याची पद्धत, दोन्ही भुवयांना जोडणारी दाट केसांची इवलीशी चंद्रकोर हे सारं चंद्रावतीच्या मनावर ठसते. यापुढे आता पहाटेची फुलं वेचणं चंद्रावतीसाठी आनंददायी ठरते.
विश्वास भेटल्यापासून चंद्रावतीचं अभ्यासावरचं लक्षच जणू उडून जातं. चंद्रावतीला जीवलग मैत्रीण शीलाला विश्वासविषयी सांगावंसं वाटतं. परीक्षेत फर्स्ट डिव्हीजन मिळावी म्हणून चंद्रावतीने बावडीतल्या गणपतीला एकवीस मंगळवारी दर्शन घेण्याचा नवस केलेला असतो. तिसऱ्या मंगळवारी ती गणपतीला पोहचते तेव्हा विश्वास गणेशबावडीच्या काठावर बसलेला असतो. चंद्रावतीची तो वाट पाहत असतो. त्यांच्यात बोलणे होते आणि तो तिला लग्नाविषयी स्पष्टपणे विचारतो. तिचा त्याला होकार असतो. गणपतिबाप्पांना साक्षी ठेवून ते दोघेही आणाभाका घेतात.
चंद्रावती हे सारे शीलाच्या कानी टाकते. विश्वास आणि चंद्रावतीच्या लग्नामध्ये जात-समाज यांचा मोठा अडथळा असतो. विश्वास डॉक्टरसाहेबांना भेटून चंद्रावतीशी लग्न करण्याविषयी सांगतो पण डॉक्टर, त्यांच्या पत्नीला हे अजिबात मान्य होणार नाही असे सांगतात. अर्थात या प्रकारामुळे ते मनातून खूप दुखावले जातात. विश्वास आणि चंद्रावती पळून जाण्याचे ठरवतात. त्याप्रमाणे विश्वास चंद्रावतीला घ्यायला येतो पण ऐनवेळी चंद्रावती माघार घेते आणि विश्वाससोबत जाण्याचे नाकारते.
सारंगपूरच्या संस्थानात राजेसाहेबांच्या पत्नी राणीमा या भोवतीच्या बायकांना बोलावून वेगवेगळे कार्यक्रम घडवीत असतात. या कार्यक्रमास जानकीबाईही जातात. तेथे आणि इतर बायकांच्या कार्यक्रमात चंद्रावतीच्या लग्नाचा विषय निघत असतो पण लवकरच आपण चंद्रावतीचे लग्न करणार आहोत असे म्हणून जानकीबाई तो विषय टाळत राहतात.
चंद्रावतीने विश्वासवर खरेखुरे प्रेम केलेले असते. पण आईवडिलांविषयीचे प्रेम, सारंगपूरमधली त्यांची प्रतिष्ठा, नातलगांमध्ये होणारी नाचक्की या साऱ्याचा विचार करून तिने माघार घेतलेली असते. अर्थात मनाविरुद्ध घेतलेल्या या निर्णयामुळे ती कमालीची दुखावते. वडिलांसोबत आईलाही याची कल्पना असल्याने जानकीबाई तिचा राग राग करतात. घरात शेखरचे कौतुक होते आणि चंद्रावतीला बोलणे बसतात. या साऱ्याने चंद्रावती हळवी होते. तिचे अभ्यासात मन लागत नाही. शीला तिची समजूत घालते पण विश्वासच्या आठवणी बाजूला पडत नाहीत.
याच दरम्यान बडेबाबूंची मोठी कन्या जामुनीही आता पोक्त होऊ लागते. तिला मनातून शेखर आवडत असतो. पण शेखरला मात्र ती नकोशी वाटते. मात्र एक दिवस चंद्रावतीने सजवलेल्या, साडी नेसलेल्या जामुनीला तो बघतो आणि त्या दिवसापासून त्याच्यात बदल होतो. जामुनीविषयी त्याला आकर्षण वाटू लागते. जामुनीही हक्काने डॉक्टरांच्या घरात वावरू लागते. शेखरच्या शर्टचे बटन लावून दे, त्याला चहा करून दे, पाणी दे अशी कामे करताना दिसते. जानकीबाईंना ते आवडत नाही, पण तरीही हा प्रकार सुरूच राहतो.
चंद्रावती त्या दोघांचे भविष्यात लग्न व्हावे अशी मनोमन इच्छा व्यक्त करते. येथेही जात-समाजाचा प्रश्न उभा असतोच. बडेबाबूंचे मोठे भाऊ दद्दा हे अत्यंत कर्मठ आणि हिंसक वृत्तीचे असतात. या अलवार प्रेमाची वार्ता त्यांच्या कानावर जाते आणि ते जामुनीला गुरासारखे मारतात. जामुनीचे येणेजाणे बंद होते. काही दिवसांनी चंद्रावती तिला भेटायला जाते तेव्हा गुपचूपपणे ती पाठीवरचे वळ चंद्रावतीला दाखवते. या सगळ्या प्रकाराने पोक्त विचार करून शेखर तिला “तू मला विसरून जा’ अशी चिठ्ठी पाठवतो.
सारंगपूरला “हरियाली तीज’ हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. त्यादिवशी सगळ्या मुली आणि बायका सजून धजून एकत्र जमतात. झोक्याची पूजा होते. बडेबाबूंच्या घरी ठाकूरांच्या पद्धतीने सारवले जाते. रांगोळ्या काढल्या जातात. शेणाने चैत्रांगण चितारले जाते. चंद्रावतीला ते करण्यासाठी जायचे नसते पण तिला जावे लागते. झुला झुलवतांना गाणे म्हटले जाते,
“बन्सी काहे बजायी – इत्ती क्या पडी थी
अभ्भी मेरी गोदमे गुड्डा गुड्डी जोडी थी
बन्सी काहे बजायी – इत्ती क्या पडी थी
नीमतले मै तो मेरे आंगणमे खडी थी
बालीसी उमरिया – मै तो बारा की मोडी थी’
चंद्रावतीच्या प्रेमप्रकरणापासून डॉक्टरसाहेब आजारी पडतात आणि हळूवारपणे त्यांची तब्येत खालावत जाते. चार-पाच वर्षांतच ते मृत्यू पावतात. आता सारंगपूरला राहण्याचे काही कारण उरत नाही. विश्वासचे लग्न होते. पुढे चौबळ कुटुंब सारंगपूर सोडते. इंदूरच्या मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर होऊन शेखर पुन्हा सारंगपूरलाच गर्व्हमेंट हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी येतो. मुंबईचा चांगला हुद्देदार मुलगा बघून चंद्रावतीचे लग्न होते. तिला मुलगा होतो. जामुनी आणि मिथलाची लग्न एकाच घरातल्या दोघा शेतकरी भावांशी होतात. घरात मोठा परिवार असतो आणि जामुनी सर्वात मोठी सून असते. पुढे मिथला अल्प आजाराने अकाली मृत्यू पावते.
काही वर्षांनी चंद्रावती भावाकडे सारंगपूरला येते तेव्हा तिच्या जुन्या साऱ्या आठवणी जाग्या होतात. विश्वास आता परदेशात असतो. त्याचे तिला स्मरण होते. शेखर-जामुनीच्या प्रेमप्रकरणाची आठवण होते. गणेशबावडी, शाळा, मैत्रिणी, झुला, दद्दा, बडेबाबू, सत्वंतीकाकू सगळे काही ताजे होते. ती बडेबाबूंच्या घरी जाते. तिथे तिला पूर्वीचेच प्रेम मिळते. दोन दिवसांनी जामुनी बाळंतपणाला येणार असल्याचे कळते म्हणून ती मुक्काम वाढवते. जामुनी आल्यावर तिच्याशी “या हृदयीचे त्या हृदयी’ हितगुज होते. जुन्या आठवणींचे नि:श्वास सोडले जातात. काय हवे होते आणि काय झाले या विचारांची अस्वस्थता दाटून येते. दोघीही नि:शब्द होतात आणि कादंबरी संपते. महाराष्ट्राबाहेर वेगळ्या प्रदेशात रूजलेलं कथानक निर्मला देशपांडे यांनी अतिशय समर्थपणे सादर केलं आहे. त्यातील चंद्रावती ही नायिका वाचकाच्या मनात घर केल्याशिवाय राहत नाही.
डॉ. विनोद गोरवाडकर





