Pune District | जेजुरी गडावर उसळला भाविकांचा महापूर
Updated On:

जेजुरी : मार्गशीर्ष महिना, लग्नसराईचे दिवस, सहलींचा हंगाम आणि नुकताच जेजुरी गडावर साजरा करण्यात आलेला चंपाषष्ठी उत्सव याचे औचित्य साधून रविवारी (दि. 8) खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर उसळला होता.
राज्याच्या विविध प्रांतातून विशेषतः ठाणे, कल्याण, मुंबई येथून भाविकांनी जेजुरीत दाखल होत देवदर्शन घेत धार्मिक विधींची पर्वणी साधली. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने गर्दीचे योग्य नियोजन करण्यात आले होते.
पुणे-जेजुरी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या लक्षणीय दिसून येत होती तसेच जेजुरी शहरात प्रवेश करताना कडेपठार कमानीनजिक चारचाकी वाहने वळत असल्याने येथे रविवारची वाहतूक कोंडी ही नित्याचीच असून येथे वाहतुकीचे नियोजन होणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.





