Indrayani River : दशक उलटले, पुनर्बांधणी रखडली; इंद्रायणी घाटाची दुरवस्था कायम
वारकरी-भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

रामकुमार आगरवाल
देहूगाव – शहरातील मुख्य मंदिर ते पवन धर्मशाळा परिसरादरम्यान इंद्रायणी नदीच्या तीरावर बांधण्यात आलेल्या घाटाचा काही भाग सुमारे एक दशकापूर्वी कोसळला. मात्र, अद्यापही या भागाची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर नदीत स्नानासाठी आणि दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी-भाविकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने लोकवर्गणीतून सुमारे दोन दशकांपूर्वी या घाटाची उभारणी करण्यात आली होती. कै. विश्वनाथ कराड यांच्या पुढाकारातून घडीव दगडांचा वापर करून घाट बांधण्यात आला होता. या घाटामुळे मुख्य मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडली होती. नदीकाठी बांधलेल्या या घाटाचा उपयोग भाविकांना स्नानासाठी तसेच धार्मिक विधींसाठी होत होता.
मात्र, ३० जुलै २०१४ रोजी माळीण दुर्घटनेच्या काळातच पवन धर्मशाळेसमोरील घाटाचा काही भाग कोसळला. तेव्हापासून या पडझड झालेल्या भागाची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी झालेली नाही. देहू येथे वर्षभरात तीन मोठ्या यात्रा तसेच विविध धार्मिक उत्सव साजरे होतात. या निमित्ताने राज्याच्या विविध भागांतून हजारो वारकरी आणि भाविक देहूत दाखल होतात.
यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचाही समावेश असतो. घाटाच्या पडझड झालेल्या भागात दगड आणि मातीचा ढिगारा साचला आहे. काही ठिकाणी पायऱ्या निसरड्या झाल्या असून त्यावर शेवाळही साचले आहे.
घाटावरील असमान पायऱ्या, पडलेले दगड आणि शेवाळामुळे पाय घसरून पडण्याचा धोका वाढला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी पाय घसरून पडल्याने अनेक भाविक जखमी झाले आहेत. काहींना डोक्याला दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत. त्यामुळे भाविकांना शारीरिक त्रासासोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
देहू हे वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे मंदिर परिसरातील घाटांची सुरक्षितता आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे. नवीन घाटाचे काम सुरू असताना जुन्या घाटाच्या दुरुस्तीचा प्रश्नही प्राधान्याने मार्गी लावणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे काम रखडत असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
नवीन घाटाचे काम सुरू, मात्र जुन्या घाटाकडे दुर्लक्ष
विशेष म्हणजे, याच परिसरालगत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून नवीन घाटाचे काम सुरू करण्यात आले. मात्र जुन्या घाटाच्या पडझड झालेल्या भागाची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत तसेच जिल्हा आणि तालुका प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. तरीही प्रत्यक्षात ठोस कार्यवाही झालेली नसल्याची नाराजी स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
‘इंद्रायणी नदीवरील घाट परिसरात भाविकांची वर्दळ असते. घाटाच्या पडझडीमुळे स्नानासाठी जाताना भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने घाटाची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी. वारकरी-भाविकांना सुरक्षितपणे स्नान व दर्शन घेता यावे, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.’ – रायबा मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज.
हेही वाचा :
PCMC News: कार्यालयीन वेळेत जागेवरून गायब; महापालिकेच्या दहा कर्मचाऱ्यांना नोटीस!





