PCMC News: कार्यालयीन वेळेत जागेवरून गायब; महापालिकेच्या दहा कर्मचाऱ्यांना नोटीस!
खुलासा असमाधानकारक आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कार्यालयीन वेळेत आपल्या नेमून दिलेल्या जागेवर उपस्थित नसल्याचे भरारी पथकाच्या तपासणीत आढळून आल्याने महापालिकेच्या दहा लिपिकांना प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
२१ आणि २२ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान ही बाब निदर्शनास आली. संबंधित कर्मचाऱ्यांकडून नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे.
महापालिकेच्या स्थापत्य व शिक्षण विभागातील लिपिकांनाही नोटीस देण्यात आली आहे. प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने कार्यालयीन शिस्त पाळणे आवश्यक आहे. याबाबत यापूर्वीही परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, तपासणी पथकाच्या पाहणीत संबंधित कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळी जागेवर उपस्थित नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्या या कृत्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (१) चा सकृतदर्शनी भंग झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ५ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (२) नुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा मागविण्यात आला आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांनी विभागप्रमुखांच्या स्पष्ट शिफारशींसह खुलासा सादर करणे बंधनकारक आहे. खुलासा असमाधानकारक आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही प्रशासन विभागाने दिला आहे.
अन्यथा होणार कारवाई
उपायुक्त संदीप खोत यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने या नोटिसा बजावल्या आहेत. महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून, या कारवाईमुळे इतर विभागांतील कर्मचाऱ्यांनीही कार्यालयीन शिस्तीचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त खोत यांनी दिला आहे.





