ध्येयासक्त पित्याची ध्येयवेडी कन्या

ऍड. कोमल साळुंखे… भोसरीतील प्रतिष्ठित अशा शाहू शिक्षण मंडळाच्या विश्वस्त… संस्थेच्या 100 शाळांच्या माध्यमातून गरीब, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या ज्ञानदात्या… आपल्या ज्ञानाच्या, समुपदेशनाच्या माध्यमातून जवळपास तीन हजार महिलांना मदत केलेल्या निष्णात वकील… विविध संस्था, संघटनांना प्रेरणात्मक व्याख्यान देणाऱ्या “मोटिव्हेटर…’ फॅशन डिझायनिंग, अभिनयानंतर तलवारबाजीचे प्रशिक्षण घेणारी विद्यार्थिनी… दोन गोंडस मुलांची आई… आणि सर्वांत महत्त्वाची ओळख म्हणजे मंगळवेढ्याचे आमदार आणि राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या…! माजी मंत्री असलेल्या आपल्या वडिलांच्या पदाचा, प्रतिष्ठेचा यत्किंचितही वापर न करता त्यांच्याकडून स्वाभिमान आणि ध्येयवादाचे संस्कार घेऊन स्वतःच्या हिमतीवर आणि हुशारीवर यश मिळवित गेलेली ही मंत्री कन्या म्हणूनच इतरांपेक्षा वेगळी ठरते…
सध्याचा काळ झटपट श्रीमंत होण्याचा आहे, अर्थात या श्रीमंतीचा पासवर्ड काही ठराविक क्षेत्रातील मोजक्याच लोकांना मिळतो. त्यातही राजकारण हे एक असे क्षेत्र समजले जाते, जिथे साधा नगरसेवकही बघता-बघता मोठा उद्योजक वगैरे बनतो. अर्थात, सगळेच असे नसतात. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही पदांनी मोठ्या, पण आर्थिकदृष्ट्या अत्यंत सामान्य जीवन जगणारी मंडळीही आहेत, ज्यांच्यामध्ये माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. मुंबईत सरकारी बंगला, नोकर-चाकर असा लवाजमा लाभलेला असतानाही आपल्या मुलांना अतिशय सामान्य जीवन जगण्यासाठी प्रेरित करणारे प्रा. ढोबळे हे त्यामुळेच लक्षात राहतात.
आपण ज्या समाजातून आलोय, त्या समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी आपण काहीतरी करणे लागतो, या विचारांनी प्रा. ढोबळे स्वतः ही साधे आयुष्य जगले आणि मुलांनाही साधेपणाचेच संस्कार दिले. त्यांच्या ध्येयासक्त विचारांचे संस्कार घेऊन त्यांची मुले कोमल, त्यांच्या भगिनी क्रांती आणि बंधू अभिजित यांनी आपली वाटचाल सुरू केली. आज मोठमोठ्या मंत्र्यांची मोठमोठी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडत असताना आपली मुले हीच आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती असल्याचं जाहीर आणि छातीठोकपणे, अभिमानाने प्रा. ढोबळे बोलतात. अशा ध्येयासक्त पित्याची तितकीच ध्येयवेडी कन्या म्हणजे ऍड. कोमल साळुंखे!
प्रा. ढोबळे यांच्या तीन मुलांपैकी कोमलताईंनाच त्यांचा अधिक सहवास लाभला. वडिलांची राजकीय कारकीर्द जवळून पाहता आली. कोमलताई लहान होत्या तेव्हा प्रा. ढोबळे त्यांना ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या आश्रमशाळेत घेऊन जात. त्यामुळे नकळतच स्वावलंबनाचे धडे त्यांना मिळत गेले. आश्रमशाळेतील मुलांची शिकण्याची जिद्द त्यांना हेलावून गेली. ग्रामीण भागातही प्रतिभावान, हुशार मुले आहेत, मात्र चांगल्या शिक्षणाच्या सोयीसुविधा नसल्यामुळे त्यांचे करियर होऊ शकत नाही, याची त्यांना जाणीव झाली. प्रा. ढोबळे यांनी लोकसहभागाने गावोगावी सुरू केलेल्या सुमारे 100 शाळांपैकी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या 20 शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे, ते केवळ कोमलताईंच्या आग्रहामुळेच.
कोमलताई 2003 साली कराड येथील संगणक अभियंता अजय साळुंखे यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. काही वर्षे मुंबईत राहिल्यानंतर प्रा. ढोबळे यांनी त्यांना पतीसह पुण्यात येऊन आपल्या प्रेसच्या व्यवसायात मदत करावी, तसेच शाळा सुरू करावी, असा आग्रह केला. पुण्यात आल्यानंतरही या स्वाभिमानी मुलीने वडिलांकडून मिळणारी मदत नाकारून बांधकाम कामगारांसाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्येच संसार थाटला.
काही दिवसांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत संसार सुरू केला. “लक्षवेधी’ या मासिकाच्या जबाबदारीबरोबरच शाळा इमारतीचे कामही पूर्ण होत गेले. यथावकाश फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट आणि ओएसीस इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले. त्यांच्या या धडपडीला वडील प्रा. लक्ष्मणराव ढोबळे आणि पती अजय साळुंखे यांनी नेहमीच भक्कम साथ दिली, हे त्या आवर्जून सांगतात. कोमलताई व अजय साळुंखे यांनी भोसरीत सुरू केलेल्या विधी महाविद्यालयात आज 900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तळागाळातील, वंचित घटकातील मुला-मुलींना अत्यल्प शुल्कात दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी हे दाम्पत्य सतत प्रयत्नात असते.
शिक्षणक्षेत्रातील उपेक्षित घटकांसाठी काम करीत असतानाच महिलांच्या सर्वांगीण विकासकरिताही त्या प्रयत्न करीत असतात. बचतगट काढून महिलांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगायला शिकविणाऱ्या कोमलताईंनी अनेक महिला उद्योजक घडविले आहेत. बचतगटांमध्ये सुशिक्षित आणि नोकरदार महिलांनी सहभाग घेतला, तर भांडवलात वाढ होऊन मोठ्या उद्योग-व्यवसायाची पायाभरणी होईल, अनेक महिलांच्या हाताला काम मिळेल, अशा ठाम विश्वासाने कोमलताईंनी त्यादिशेने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. बचतगटांचे महत्त्व प्रत्येक महिलेने जाणून घ्यावे, अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात. महिलांना कायद्याचे पुरेसे ज्ञान नसते, हे जाणून कोमलताई अन्यायग्रस्त महिलांना कायदेविषयक मोफत समुपदेशनही करतात. आत्तापर्यंत जवळपास तीन हजार महिलांना त्यांनी या माध्यमातून मदत केली आहे.
कोमलताईंनी या सर्व व्यापातून स्वतःच्या आवडीनिवडी ही जपल्या आहेत, हे विशेष. फॅशन आणि अभिनयाचे धडे गिरवित त्यांनी अनेक सौंदर्यस्पर्धेतही भाग घेतला. 2018 साली नवी दिल्लीत पार पडलेल्या “मिसेस इंडिया’ स्पर्धेत सहभागी झालेल्या कोमलताईंनी “मिसेस महाराष्ट्र’ चा मुकुट पटकाविला. आवड म्हणून त्यांनी तलवारबाजीचे प्रशिक्षण ही घेतले आहे.
राजकारणात मोठा माणूस असलेल्या आपल्या पित्याच्या माध्यमातून कसलाही संघर्ष न करता कोमलताईंच्या पायाशी जगातील सर्व सुखांनी लोळण घेतली असती. पण जगायचं तर समाजातील वंचितांसाठी, उपेक्षितांसाठी या पित्याच्या उक्तीवर आणि कृतीवरही ठाम राहून, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजकारण करीत जाणाऱ्या चतुरस्त्र कोमलताईंचा आदर्श खरोखर सर्वांनीच घ्यावा असाच आहे.






