Pune District : बंधारा बांधला, पण पाणीच साठवत येईना

बेल्हे : नळवणे (ता. जुन्नर) येथील खबडाई साठवण बंधारा महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत 2017मध्ये बांधण्यात आला असून बंधार्याच्या पश्चिमेकडील शेतकर्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची सोय न केल्यामुळे आजपर्यंत या बंधार्यात पाणीसाठा करता आला नाही. त्यामुळे ज्या उद्देशाने हा बंधारा बांधला त्याचा कोणताही फायदा परिसरातील शेतकर्यांना झालेला नाही. बंधारा बांधताना पर्यायी रस्त्यासाठी बाजूच्या शेतकर्यांनी संमती दिलेली असून रस्ता तयार करून पाणीसाठा करावा, अशी मागणी शेतकर्यांनी अनेक वेळा केलेली आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतीसाठी पाण्याची अत्यंत गरज आहे.
एवढा निधी खर्च करूनही बंधार्यांमध्ये पाणी साठवता येत नाही हेच मोठे दुर्दैव म्हणावे लागले.
पुणे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाअंतर्गत 13 लाख 29 हजार रुपये खर्च करून खबडाईत बांधण्यात आलेल्या बंधार्यात पाणी साठल्याने येथून असणारा रस्ता बंद होत आहे. त्यामुळे निमदरा, शेेलपाटी, चिंचमाळी, चढे पठार, पळसठिका या ठिकाणचे दळणवळण बंद होत आहे. या ठिकाणी बंधारा बांधण्यासाठी शेतकर्यांनी आधीच विरोध केला होता; परंतु येथून रस्ता काढून देणार असल्याचे शेतकर्यांना आश्वासन देण्यात आले होते.
ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे संबंधित कामासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत शेतकर्यांना ये-जा करण्यासाठी या बंधार्यातून जावे लागते. त्यामुळे पाणीसाठा करता येत नाही. ऐन दुष्काळाच्या छायेत असणार्या पठार भागातील शेतकर्यांसाठी हेच साठवण बंधारे वरदान ठरत असताना आपल्या शेता शेजारील बंधार्यातून पाणी डोळ्यादेखत वाहुन जात असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
शासनाने लवकरात लवकर या रस्त्यासाठी नीधी उपलब्ध करून द्यावा व बंधार्यात पाणीसाठा करावा अशी मागणी शेतकरी संतोष शिंदे, गुलाब शिंदे, संभाजी देशमुख, कुलकर्णी काका, तुकाराम साबळे, खंडू शिंदे, शंकर शिंदे यांनी केली आहे. रस्त्यासाठी येथील शेतकर्यांनी संमतीपत्र ही दिले आहेत. तरी रस्त्याला किंवा पुलाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.





