पिंपरी | शेवटच्या दिवशी अर्ज भरायला लाडक्या बहिणींची झुंबड

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये समावेश व्हावा यासाठी शासनाने दिलेल्या शेवटच्या (१५) तारखेला पोस्ट ऑफिस, बँकामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून यात लाभार्थी होण्यासाठी महिलांनी पहिल्यापासूनच प्रतिसाद दिली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून या योजनेस दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरी देखील आधार कार्ड लिंक होणे, फॉर्म नोंदणी न होणे, नावातील बदल, माहेरचं नाव, सासरचं नाव यातील चुका अशा अनेक कारणांमुळे अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.
अशा महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून योजनेमध्ये सहभागी होता यावे याकरीता शासनाकडून १५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
त्यानुसार अखेरच्या दिवशी लाडक्या बहिणींनी पोस्ट ऑफिस, बँका आदी ठिकाणी दुरुस्तीसह अर्ज भरून देण्यासाठी गर्दी केली होती.
तळेगावमध्ये सकाळपासून महिला वर्ग चहा नाष्टा न करता आपल्या लहान मुलांना घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये आल्या होत्या. मोठी गर्दी झाल्याने व कोणतीही सुविधा किंवा नियोजन नसल्याने महिलांना तासन तास उभे राहून वाट पाहावी लागत होती.
यावेळी फॉर्म भरून दिल्यानंतर लाडक्या बहीण योजनेचा फायदा मिळेल की नाही, याची देखील चर्चा महिला वर्गात सुरू होती.




