पुणे जिल्हा | मुलीला बेवारस सोडून जाणाऱ्या आई वडिलांवर गुन्हा

शिक्रापूर, (वार्ताहर)- पाबळ (ता. शिरुर) येथे कामानिमित्ताने आलेल्या एका दाम्पत्याने जाणीवपूर्वक आपल्या नऊ वर्षीय बालिकेला बेवारसपणे सोडून देऊन पोबारा केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मुलीच्या रेश्मा पवार व सुदाम पवार या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाबळ येथे एक अल्पवयीन मुलगी बेवारसपणे फिरत असल्याचे बंडू शिंदे व सुनील वाघोले यांना दिसून आले.
त्यांनी मुलीला पाबळ पोलीस चौकीमध्ये आणले असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर यांसह महिला पोलीस शिपाई अंकिता पाटोळे यांनी मुलीकडे चोकशी केली. तिने तिचे नाव दुर्गा सुदाम पवार असून तिचे आई वडील उसतोड अथवा वीटभट्टीवर काम करतात. आई वडिलांनी मला ट्रकमधून खाली उतरवून निघून गेल्याचे सांगितले.
पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करुन मुलीला बालकल्याण समिती पुणे येथे हजर केले. त्यांनी मुलीला ज्ञानेश बालसदन येथे दाखल करण्याचे आदेश दुईले, तर याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय नामदेव चौधर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. मुलीचे वडील सुदाम पवार व आई रेश्मा सुदाम पवार (दोघे रा. खरजाई, जि. जळगाव) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.




