माळशेज घाटात दरड कोसळली

ओतूर – गेली आठ दिवसांपासून माळशेज घाटात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे डोंगर निसरडे झाले असून वाहन प्रवासासाठी धोकादायक झाले आहे. अशातच मंगळवारी (दि. 18) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात अचानक दरड कोसळली.
सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही; परंतु यामध्ये एक आयशर ट्रक मार्गस्थ होत असताना दरड कोसळल्यामुळे या ट्रकचे किरकोळ नुकसान वगळता ट्रक चालक वाचला आहे, असे प्रत्यक्षदर्शी सचिन सुदाम तांबे यांनी सांगितले.
दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहनांची रांग लागली होती. तर रस्त्यावर आलेल्या राडारोड्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती.
दरड कोसळण्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कळतात काही वेळातच रस्त्यावर आलेला राडारोडा बाजूला करून रस्ता पूर्वरत चालू करण्यात आला. माळशेज घाटात दरवर्षी जास्त पाऊस झाल्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात परिणामी प्रवाशांनी प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे.





