पिंपरी | ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी दिल्लीतील कंपनीची होणार नियुक्ती

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका २२ ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. ‘बांधा आणि संचलित करा’ या तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यासाठी महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. यासाठी दिल्लीतील झिवा या कंपनीला हे काम देण्यात येणार आहे. महापालिकेकडून या कंपनीला केवळ जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा धोरणांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमास चालना मिळण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या कामी महापालिकेमार्फत ईव्ही चार्जिंग स्टेशन २२ ठिकाणी ‘स्वत: बांधा आणि संचलित करा’ या मॉडेलवर इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगची सुविधा कमी दराने उपलब्ध करून दिली आहे.
या एजन्सींना महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या जागेवर सात वर्षांकरिता देखभाल करणे या बाबी एजन्सीने करणे आवश्यक राहील.
तिसऱ्या निविदेला प्रतिसाद
प्रशासक राजेश पाटील यांनी या विषयाला मंजुरी दिली होती. त्यानंतर ९ मे २०२३ प्रथम व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.
मात्र, कोणत्याच कंपनीने प्रतिसाद न दिल्याने २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला असून दिल्ली झिवा या कंपनीला हे काम देण्यात येणार आहे.
अशी आहेत चार्जिंग स्टेशन
पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात, पिंपरीतील सीट्रस हॉटेलजवळ, दुर्गादेवी टेकडी – निगडी, वाहतूकनगरी, बर्ड व्हॅली – संभाजीनगर, बजाज ऑटोजवळ,
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल – भोसरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम – नेहरूनगर, मलनिस्सारण केंद्र – चिखली, राधास्वामी रोड – चिखली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव – कासारवाडी, निसर्गनिर्माण सोसायटी, रिलायन्स मार्टजवळ, कोकणे चौक- पिंपळे सौदागर,
विंटेज सोसायटी – पिंपळे सौदागर, योगा पार्क, विबग्योर शाळा- पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान- पिंपळेगुरव, वंडर कार्स, निसर्ग निर्माण सोसायटी – कोकणे चौक,
पिंपळे सौदागर, भक्ती शक्ती बस टर्मिनल – निगडी, एच ए कंपनी सबवेजवळ, सीएमई सीमाभिंतीलगत -फुगेवाडी आणि संत तुकाराम मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराजवळ ईव्ही चार्जिंगसाठी जागा निश्चिती केली आहे.
२०२२ पासून इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरु होती. तिसऱ्यांदा निविदा काढल्यानंतर दिल्लीतील कंपनीने प्रतिसाद दिली असून निविदेची प्रक्रिया पुर्ण झाली आहे.
ग्राहकांसाठीच्या कमाल मर्यादा दराप्रमाणे प्रतियुनिट १७ रुपये अधिक सेवावस्तू कर अशी रक्कम ही एजन्सी चार्जिंग फी म्हणून ग्राहकांकडून वसूल करू शकते. – अनिल भालसाकडे, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग महापालिका





