पिंपरी | बोपखेल-खडकी उड्डाण पुलाला मिळेना मुहूर्त

पिंपरी, प्रतिनिधी) – बोपखेल-खडकीला जोडण्यासाठी मुळा नदीपात्रावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून येत्या दोन महिन्यांत शंभर टक्के काम पूर्ण करुन पुलावरुन सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यात येणार असल्याचा दावा अधिका-यांनी २६ जून रोजी केला होता.
त्याला दोन महिन्यांचा अवधी उलटून सप्टेंबर अर्धा संपला तरी उड्डाण पूल खुला करण्यास महापालिकेला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बोपखेल येथून खडकी येथे जाण्यासाठी तब्बल दहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बोपखेल येथून दापोडीमार्गे सीएमई (लष्कर हद्द) हद्दीतून जाणारा रस्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १३ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला.
त्यामुळे बोपखेल गावातील रहिवाशांना दापोडीमार्गे खडकीत जाण्यासाठी तब्बल १६ किमोमीटरचा वळसा घालावा लागत आहे.
त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थी तसेच कामगारांची गैरसोय सुरु आहे. नागरिकांच्या सोयीसाठी याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय २० जुलै २०१९ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून घेण्यात आला.
तब्बल ४५ कोटी ४६ लाख ३९ हजार १२२ एवढ्या खर्चाचे उड्डाण पुलाचे काम मे. टी. ॲण्ड टी इन्फ्रा लिमिटेड या ठेकेदार संस्थेला देण्यात आले. त्यांना २४ महिन्याची मुदत देण्यात आली. ती मुदत १९ जुलै २०२१ रोजी संपुष्टात आली. विविध कारणांमुळे या कामाला विलंब लागल्याने संबंधित ठेकेदाराला १७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
पुलाची लांबी १८५६ मीटर असून रुंदी ८.४० मीटर एवढी आहे. बोपखेलच्या बाजुला ५६ मीटर अंतर तर खडकीच्या बाजुला २६२ मीटर पुलाचे अंतर आहे. २०१९ मध्ये सुरु करण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे काम ९८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा स्थापत्य विभागातील अधिका-यांनी २६ जून रोजी केला.
पुढील दोन महिन्यात शंभर टक्के काम पूर्ण करुन सार्वजनिक वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल सुरु करण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले होते.
दोन महिने उलटून सप्टेंबर अर्धा उलटला तरी पुलाचे काम पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे बोपखेल, दापोडी, खडकी येथील नागरिकांनी महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
पथदिवे बसविण्याचे काम सुरु
बोपखेल-खडकी उड्डाण पुलाचे स्थापत्य विषयक काम पूर्ण झाल्याचा दावा अधिका-यांनी केला आहे. सध्या विद्युत विषयक कामे सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
उड्डाण पुलावरील पथदिवे, उड्डाणपुलाच्या खालील दिवे बसविण्याची कामे सुरु असेही संगितले जात आहे.
उड्डाण पुलाची स्थापत्य विषयक सर्व कामे पूर्ण झाली आहेत. नुकतीच कार्यस्थळाला भेट दिली असून तुर्तास पुलावरुन प्रवेश नाकारण्यात आला आहे.
सध्या विद्युत विषयक कामे सुरु असून येत्या २५ सप्टेंबरपर्यंत तेही मार्गी लागतील. त्यानंतर उड्डाण पुलाचे उद्घाटन करुन सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. – प्रमोद ओंभासे स शहर अभियंता





