पिंपरी | सीएसआर निधीतून आरोग्यवर्धिनी केंद्र

पिंपरी (प्रतिनिधी) – शहराला पायाभूत सुविधा पुरविताना इतर सुविधांसोबत वैद्यकीय सुविधांमध्येही आधिकाधिक सुधारणा करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यातील काही प्रकल्पांमध्ये किंवा विकासकामांमध्ये सीएसआर निधीचा महत्वाचा वाटा आहे.
सीएसआर निधीसोबत शहरातील विविध नामवंत कंपन्यांच्या अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शनही महापालिकेस लाभले असून फुगेवाडी येथे उभारण्यात आलेले आरोग्यवर्धिनी केंद्र त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी रुग्णालयाच्या अंतर्गत फुगेवाडी येथे आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले,
त्यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन समारंभास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, सांगवी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, सीएसआर सेल सल्लागार श्रुतिका मुंगी उपस्थित होते.
डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, आरोग्य वर्धिनी केंद्रामुळे परिसरातील सुमारे १२ हजार नागरिकांना लाभ होणार आहे. शहरातील आणखी ६७ ठिकाणी या केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. झोपडपट्टीसदृश भागात किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यास मदत मिळेल.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे केंद्र सुरू राहणार असून येत्या काही दिवसांत मनुष्यबळ वाढवून सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत केंद्र सुरू ठेवण्यात येतील. ज्यांना कामामुळे सकाळी उपचार घेणे शक्य नसेल ते संध्याकाळीही उपचारासाठी डॉक्टरांची भेट घेऊ शकतील.
नागरिकांना मिळतील या सुविधा
आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एकूण ७ कक्ष उभारण्यात आले आहे. या सात कक्षांमध्ये केस पेपर नोंदणी, बाह्यरुग्ण विभाग, इंजेक्शन व ड्रेसिंग रूम, प्रयोगशाळा विभाग, औषध वाटप, नियमित लसीकरण कक्ष, वेलनेस ऍक्टिव्हीटी रुम आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.
या केंद्राद्वारे गर्भधारणा आणि बाळंतपणाची काळजी, नवजात आणि अर्भकांची काळजी, बालपण आणि पौगंडावस्थेतील आरोग्य, कुटुंब नियोजन आणि गर्भनिरोधक सेवा, संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन, विविध आरोग्य कार्यक्रम, नेत्ररोग आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा विविध सेवा पुरविण्यात येणार आहेत.





