Junnar : चक्क मांजरीची सिझर डिलिव्हरी! जुन्नरमध्ये नेमकं काय घडलं…

ओझर : आजपर्यंत आपण प्राण्यांमध्ये मांजरीची सिजर करून डिलिव्हरी झालेली गोष्ट कधी ऐकली नाही मात्र जुन्नर मधील बोडके नगर येथे अथर्ववेद हाईट मधे राहणाऱ्या गणेश किसन बेळे व लता बेळे यांच्या पाळीव मांजरीची सिजर करून डिलिव्हरी करण्यात आली. मांजरीची दोन पिल्ले पोटातच मरण पावल्याने सिजरिंग करावे लागले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बेळे कुटुंबांनी पाळलेली मांजर ही गरोदर होती. २१ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता या मांजरीची तिसरी डिलिव्हरी प्रक्रिया सुरू झाली. रात्रभर मांजरीला कळा येत होत्या तिच्या वेदना असह्य होत होत्या. काही केल्या नॉर्मल डिलिव्हरी होईना. मग २२ जानेवारी रोजी सकाळी जुन्नर पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी मांजरीला तपासले असता डॉक्टरांनी सिजर करावे लागेल असे सांगितले.
बेळेनी डॉक्टरांना मांजरीला वाचवण्याची विनंती केली. डॉक्टरांनी मांजर १००% वाचेल पण एक टक्का गॅरंटी देऊ शकत नाही असे सांगितले.बेळेनी मनाची तयारी करून धाडसी निर्णय घेऊन डॉक्टरांना सिजर करण्यास सांगितले. संध्याकाळी ६ वाजता डॉ. सागर परदेशी,डॉ.बाळकृष्ण मुखेकर,डॉ.चांगदेव पथवे डॉ. साहिल ताम्हाणे या चार डॉक्टरांची टीम बेळेच्या घरी पोहोचली.
ऑपरेशन सुरू करण्याआधी मांजरीला भुलीचे इंजेक्शन दिले गेले ऑपरेशन सुरू झाले. मांजरीची दोन पिल्ले पोटातच मरण पावली होती व दोन जिवंत पिल्ले शस्त्रक्रियेनंतर जन्माला आली. ऑपरेशन नंतर मांजरीच्या पोटाला टाके घालण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.ऑपरेशन नंतर मांजरीला अशक्तपणा आला होता त्यामुळे ती पिल्लांना जवळ घेऊ शकली नाही.
बेळेनी पिल्लांना थोडंसं गाईचं दूध पाजलं व नंतर २३ जानेवारी पहाटे मांजर स्वतः पिल्लांजवळ आली अंगात काही शक्ती नसताना देखील ती चालू लागली तिच्या टाक्यांना इजा होऊ नये म्हणून तिला मास्क घातले होते त्यामुळे ती पिल्लांना चाटू शकली नाही खूप प्रयत्नानंतर मनी माऊची पिल्ले मनीमाऊचे दूध पिऊ लागली. या सर्व प्रकारात बेळकुटुंबांचे प्राणीमात्रावरील प्रेम व देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय आला.





