सातारा | अपसंपदेप्रकरणी फलटणच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा

सातारा | एकूण उत्पन्नाच्या पंचवीस टक्के अपसंपदा कमावल्याप्रकरणी बरड, ता. फलटण येथील पशुवैद्यकीय अधिकारी दिलीप महादेव नाझीरकर (वय 55 रा. फ्लॅट नंबर 16 नारायण अपार्टमेंट चिंचकर इस्टेट टीसी कॉलेजच्या पाठीमागे बारामती, जि. पुणे) यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नाझरकर यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी 11 जून 2011 ते 7 सप्टेंबर 2019 या कालावधीत आपल्या पदाचा वापर करून अर्जित उत्पन्नापेक्षा अन्य मार्गाने स्वतःची 15 लाख 84 हजार 171 रुपये किमतीची अपसंपदा गोळा केली. ही एकूण उत्पन्नाच्या 25.60 टक्के इतकी आहे ही अपसंपदा त्यांनी गैर मार्गाने संपादित केल्याचे निष्पन्न झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांनी सरकारच्या वतीने संपदा बाळगल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 13 / 1 व 13 / 2 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पोलीस निरीक्षक सचिन राऊत तपास करत आहेत. भ्रष्टाचारासंबंधात काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





