अफगाणमधील मशिदीबाहेर बॉम्बस्फोट

काबुल – अफगाणिस्तानमधील पूर्व अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरातील एक शिया मशिदीत शुक्रवारी दुपारी भीषण बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात प्राथमिक माहितीनुसार 37 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. सलग दुसऱ्या आठवड्यात शिया मशिदीला लक्ष्य करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शिया मशिदीवर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट जलालाबादमधील एका मशिदीत झाला. या स्फोटात 37 जणांचा मृत्यू झाला असून 70हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही.
नांगरहार प्रांताचे सरकारी प्रवक्ते कारी हनीफ म्हणाले की, जलालाबाद शहरातील मशिदीबाहेर बॉम्ब पेरण्यात आला होता. तसेच शिया मशिदीत स्फोट झाल्याचे जाणून आम्हाला दुःख झाले आहे. घटनेचे स्वरूप तपासण्यासाठी आणि गुन्हेगारांना न्याय देण्यासाठी इस्लामिक अमिरातीचे विशेष दल त्या भागात पोहोचले आहे आणि कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कुंदुझ प्रांतातील शिया मशिदीत 8 ऑक्टोबर रोजी शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. यामध्ये 50हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आयएस-के या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.





