अफगाणिस्तानातील हॉस्पिटलमध्ये स्फोट, 19 ठार 50 जखमी

काबूल – अफगाणिस्तानमधील एका रुग्णालयात झालेल्या एका बॉम्बस्फोटात किमान 19 जण ठार झाले आणि 50 जण जखमी झाले आहेत. या रुग्णालयात एकूण 2 स्फोट झाले असे स्थानिक प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.
यातील पहिला स्फोट काबूलमधील सरदार दाऊद खान हॉस्पिटलमध्ये झाला, अशी माहितीने तालिबानी प्रवक्त्याच्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. याच रुग्णालयाच्या आवारामध्ये थोड्या वेलाने दुसरा स्फोट झाला. या स्फोटाद्वारे रुग्णालयातील सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तालिबानचा उप प्रवक्ता बिलाल कारिमी याने म्हटले आहे.
या दोन्ही स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र इस्लामिक स्टेटचे काही सदस्य या रुग्णालयाच्या आवारात घुसले होते आणि त्यांचा सुरक्षा रक्षकांबरोबर संघर्षही झाला होता, असे काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
इस्लामिक स्टेटच्या एका सदस्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आत्मघातकी स्फोट घडवून आणला. त्यानंतर अन्य सदस्य रुग्णालयात घुसले. आता इस्लामिक स्टेटचे हे हल्लेखोर आणि तालिबानमध्ये रुग्णालयाच्या आवारातच जोरदार संघर्ष सुरू झाला असल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.





