नंदुरबार : नंदूरबारमधील काँग्रेस नेते व आदिवासींचे प्रश्न मांडणारे दिवंगत काँग्रेस नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यांचे वडील दिवंगत माणिकराव गावित हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते. तसेच ते उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जायचे. माणिकराव गावित यांनी २००४ मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि २०१३ मध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. भरत गावित यांचा नंदुरबार भागातील मतदारांवर प्रभाव असून, त्यांच्या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षाचा आदिवासी जनाधार वाढू शकतो. सध्या ते आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे, नवापूरचे अध्यक्ष आहेत. ते नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, तसेच ते नवापूर विधानसभा मतदारसंघातील लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पक्षप्रवेशानंतर भरत गावित म्हणाले, नवापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी मी अजित पवारांबरोबर आलो आहे. या माध्यमातून मी माणिकराव गावित यांचा समृद्ध वारसा पुढे नेणार आहे. दरम्यान, भरत गावितांनी भाजपाच्या तिकीटावर २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या शिरीषकुमार नाईक यांच्यासमोर गावितांचा पराभव झाला होता. नाईकांना ७५,६५२ मतं मिळाली होती. तर, गावितांना ५८,५५९ मतं मिळाली होती. गावित तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.