nagar | राज्यात महायुती विरोधात मोठी लाट

संगमनेर, (प्रतिनिधी)- देशात वाढलेली महागाई व बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे तर महाविकास आघाडीचीच सर्वत्र हवा आहे. जनकल्याणाचा महाविकास आघाडीचा विचार सर्वांनी घराघरात पोहोचवावा, असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
अमृता लॉन्स येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले,
हेमंत ओगले, डॉ.एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, करण ससाणे, शिवाजी नेहे, सुनीता भांगरे ,मधुकर तळपाडे ,शिवसेनेचे जगदीश चौधरी, संजय फड, आप्पासाहेब केसकर, सुधीर म्हस्के, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख आदींसह मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, पक्षाने टाकलेला विश्वास आणि जनतेचा विश्वास आपण सार्थ ठरून जनतेचा खासदार म्हणून आपल्या सर्वांच्यासोबत अत्यंत प्रामाणिकपणे काम करू. मागील पाच वर्षाच्या काळात अनेक विकासाच्या योजना गावोगावी राबविल्या असल्याचेही ते म्हणाले. या बैठकीसाठी संगमनेर, अकोले, श्रीरामपूर ,राहाता, कोपरगाव, नेवासा, राहुरी, येथील महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे विविध पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॅमेरे बंद, पत्रकारांचा काढता पाय
संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत मीडियाचे कॅमेरे बंद करण्यास सांगितले. त्यामुळे पत्रकारांना या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीत असणारी नाराजी जगासमोर येऊ नये, यासाठी पत्रकारांना कार्यक्रमातून काढून दिल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.




