संसद घुसखोरी प्रकरणी मोठी अपडेट ! दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आणखी एकाला अटक

नवी दिल्ली – संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. महेश कुमावत असे या आरोपीचे नाव असून तो गुरुवारी रात्री ललित झा यांच्यासह स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आणि दोघांनाही विशेष कक्षाच्या ताब्यात देण्यात आले आहे असे अधिकाऱ्याने सांगितले.
तेव्हापासून त्याची चौकशी सुरू आहे. कुमावत हा आरोपीने तयार केलेल्या भगतसिंग फॅन क्लब पेजचा तो सदस्य होता. पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली कुमावतला अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्यक्ष संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना घटनेच्या दिवशीच ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात कोणकोण होते त्यांचा आता शोध घेतला जात आहे.
या प्रकरणाचा ललित झा हा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात असून त्यालाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. आमचा कोणत्याही संघटनेशी संबंध नाही, आम्ही शहीद भगतसिंह यांच्या विचाराने प्रेरीत झाल्याचा दावा आरोपींकडून केला जात आहे.
सागरने दिली धक्कादायक माहिती
पोलिसांच्या चौकशीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी सागर शर्माने सर्वात मोठा खुलासा केला आहे. चौकशी दरम्यान सागरला संसदेबाहेर आत्मदहन करायचे होते,” अशी धक्कादायक माहिती त्याने दिली आहे. सागर शर्मा आणि मनोरंजन डी हे दोन लोक सभागृहात घुसले आणि त्यांनी स्मोक बॉम्बने हल्ला केला आणि सभागृहात धूर पसरला.





