प्रसिद्ध संवादिनी वादक संतोष घंटे यांची विशेष मुलाखत
पिंपरी – भारतीय संस्कृतीविषयी विदेशामध्ये आत्मीयता वाढत चालली आहे. कार्यक्रमानिमित्त विदेशात गेल्यानंतर भारतीय कलाकारांना चांगली दाद मिळते. त्यातही शास्त्रीय संगीताला मानणारा एक मोठा चाहता वर्ग आहे, असे मत प्रसिद्ध संवादिनी वादक संतोष घंटे यांनी गुरूवारी “दै. प्रभात’शी बोलताना व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड शहरातील घंटे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत देश-विदेशात पोहोचविण्यासाठी मोठे श्रम घेतले आहेत.
रावेत येथील संवादिनी वादक संतोष घंटे हे सध्या संवादिनी वादनाच्या कार्यक्रमानिमित्त विदेश दौऱ्यावर आहेत. स्वित्झर्लंड, इटली, जर्मनी आदी देशांमध्ये 26 ऑक्टोंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने संवादिनी वादनाची कार्यशाळा, संवादिनी वादनाचे स्वतंत्र कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय वादकांचा सहभाग असणाऱ्या कार्यक्रमाचा समावेश आहे. या दौऱ्यातील अनुभवाबाबत ते स्वित्झर्लंड येथून “दै. प्रभात’शी बोलत होते.
घंटे म्हणाले, स्वित्झर्लंडमधील झुरीच येथे इंडो स्वीस सेंटरच्या वतीने दिवाळीनिमित्त खास कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात गझलकार सुरेश भट यांची काही गीते सादर केली. येथील गायकांनीच ही गीते गायिली. विदेशात गेलेले भारतीय आपली संस्कृती येथे जपताना पाहण्यास मिळतात. त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमात मी संवादिनीवर साथसंगत केली. संवादिनीवर मधुवंती रागातील तीनतालातील बंदीश सादर केली. तसेच, झाला वाजविला, झुरीच येथे येत्या शनिवारी (दि. 2) संवादिनी वादनाची कार्यशाळा आहे. रविवारी (दि. 3) जिनीव्हा येथे कार्यक्रम होणार आहे.
विदेशामध्ये शास्त्रीय संगीत आणि वादनाच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, हॉलंड, बेल्जियम, इटली, स्वित्झर्लंड, माल्टा तसेच मॉरिशस, दुबई आदी ठिकाणी माझे विविध विदेश दौरे झाले आहेत. येथे भारतीय कलाकारांना चांगला मान मिळत असून आत्मीयतेचा अनुभव येतो. विदेशात भारतीय कला, परंपरा आणि संस्कृती यांच्याविषयी आस्था असणारा एक वेगळा वर्ग आहे, असे घंटे म्हणाले.
विविध देशांत कार्यक्रम
विदेश दौऱ्यामध्ये स्वित्झर्लंडमधील झुरीच, जिनीव्हा येथे संवादिनी वादक संतोष घंटे यांचे कार्यक्रम होत आहेत. त्याशिवाय, इटलीतील मिलान आणि बलोग्ना या शहरांमध्ये देखील त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. तर, जर्मनी-फ्रॅंकफ्रट येथे 13 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील वादकांचा सहभाग असणारा कार्यक्रम नियोजित आहे. त्यामध्ये भारतासह आफ्रिका, अमेरिका, स्पेन आदी ठिकाणांवरून वादक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात प्रत्येक वादक आपापल्या वादन कलेचे सादरीकरण करणार आहेत.