मधमाशी घशात गेली अन्…; करिश्माचा पती संजय कपूरच्या मत्यूचे कारण समोर; नेमक काय घडलं?

Sanjay Kapoor passed away : अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एक्स पती आणि उद्योपती संजय कपूर यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने इंग्लंडमध्ये निधन झाल्याची बातमी समोर आली होती. विशेष म्हणजे अहमदाबाद येथील घटनेवर त्यांनी एक्सवरून पोस्ट करत शोक व्यक्त केल्यानंतर त्यांचे निधन झाले होते. हृदयविकाराचा झटका आल्याने संजय कपूर यांचे निधन झाल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण आता समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधमाशी गिळल्याने संजय कपूरचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, संजय कपूर पोलो खेळत असताना त्यांना अचानक गुदमरल्यासारखं झालं. त्यांनी खेळ थांबवण्याची विनंती करत मैदानाबाहेर गेले. माहितीनुसार संजय कपूरने मधमाशी गिळली होती.
त्यांच्या घशात मधमाशीने दंश केला आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती संजय यांच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे. संजय कपूर हा एक प्रसिद्ध उद्योगपती होता. त्याला पोलो खेळण्याची आवड होती. तो सोना पोलो संघाचा मालक होता. परंतु, एका मधमाशीने घात केला आणि त्याचा मृत्यू झाला.
अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी पोस्ट
‘अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघाताची खूप दुःखद बातमी मिळाली. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. देव त्यांना या कठीण काळात शक्ती आणि धैर्य देवो.’ असे ट्वीट त्यांनी १२ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता केले होते.
…अन् घटस्फोट घेतला.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे २००३ साली लग्न झाले होते. ११ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि २०१४ ला त्यांचा घटस्फोट झाला. करिश्मा आणि संजय यांना मुलगी समायरा आणि मुलगा कियान ही दोन अपत्ये आहेत. मुलांची कस्टडी करिश्माला मिळाली. संजय कपूर यांचा करिश्मा कपूरशी घटस्फोट झाल्यानंतर प्रिया सचदेव यांच्याशी लग्न झाले होते.
हेही वाचा: धक्कादायक… ! बीडमध्ये पाचवीत शिकणाऱ्या मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह; पहिला नवरा पसार, दुसऱ्याला अटक





