Sunrisers Hyderabad : आयपीएल २०२६ हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यंदाचा पहिला सामना २८ मार्च २०२६ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात बंगळूरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संघ तयारीच्या अंतिम टप्प्यात असतानाच दुखापतीमुळे खेळाडूंच्या बदल्या सुरू झाल्या आहेत. यात सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू जॅक एडवर्ड्स पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर झाला आहे. मिनी-लिलावात सनरायझर्सने (Sunrisers Hyderabad) त्याला ३ कोटी रुपयांना खरेदी केले होते, पण आता तो खेळू शकणार नाही. यामुळे हैदराबाद संघाला वेगवान गोलंदाजी विभागात मोठी उणीव भासत होती. डेव्हिड पेनची बदली म्हणून निवड या पार्श्वभूमीवर सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडचा ३५ वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज डेव्हिड पेनला जॅक एडवर्ड्सच्या जागी घेतले आहे. पेनला १.५ कोटी रुपयांचा करार देण्यात आला आहे. तो लवकरच संघात सामील होईल आणि हंगामातील पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. Sunrisers Hyderabad कोण आहे डेव्हिड पेन? भारतीय क्रिकेट रसिकांना डेव्हिड पेन फारसा परिचित नसला तरी तो टी-२० क्रिकेटमध्ये अत्यंत अनुभवी गोलंदाज आहे. त्याने २३३ टी-२० सामन्यांत ३०४ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडकडून त्याने फक्त एकच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून, त्यात एक विकेट घेतली. तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. पेन मुख्यतः बिग बॅश लीग (BBL) मध्ये खेळतो. यावर्षी त्याने BBL जिंकणाऱ्या संघासाठी प्रभावी कामगिरी केली. तसेच ILT20 (इंटरनॅशनल लीग टी-२०) मध्येदेखील त्याने ८ सामन्यात १० विकेट्स घेतल्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने तो भारतीय फलंदाजांसाठी मोठा धोका ठरू शकतो. त्याच्या अनुभवामुळे सनरायझर्स हैदराबादच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी आव्हान सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) यंदा दुखापतींचा मोठा फटका बसत आहे. पॅट कमिन्स सुरुवातीला उपलब्ध नसल्याने इशान किशन हा अंतरिम कर्णधार असेल. आता जॅक एडवर्ड्सनंतर डेव्हिड पेनला संधी मिळाली आहे. तरीही संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल आहे. २८ मार्च रोजी RCB विरुद्धच्या उद्घाटन सामन्यात पेनची कामगिरी कशी राहील याकडे सर्वांचे लक्ष असेल.