उंब्रज – वडगाव, ता. कराड गावच्या हद्दीत घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेवर उंब्रज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित महिलेने बारा वर्षांपासून भारत देशात अवैद्यरित्या पश्चिम बंगाल मार्गे घुसखोरी करुन बनावट जन्म दाखला, आधारकार्ड तयार करुन वास्तव्य करत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे मंगळावर, दि. 16 सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रिया रेहमान बिस्वास (वय 33, मुळ रा. ग्राम गाजीरहट, पारमचोदूपूर जि. खुलना, बांगलादेश) असे तिचे मूळ नाव असून ती रिया सोहाक शेख व रिया विक्रम कदम ( सध्या रा. वडगाव, ता. कराड) या नावाने वास्तव्य करत होती. याबाबतची माहिती अशी की, संशयित महिला ही शिरगाव (वडगाव) गावच्या हद्दीत वास्तव्य करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी उंब्रज पोलिसांना माहिती दिली. सपोनि रविंद्र भोरे यांनी पोलीस कॉन्स्टेबल साळे, मपोकॉ. धोंगडे, होमगार्ड गाडे, पाटील, जिल्हा विशेष शाखेचे सहा. पो. फौ. भोसले यांचे पथक तयार करून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान पथकाला संशयित महिला मिळून आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत काही बाबींचा उलगडा झाला आहे. यामध्ये वसई, विरार, पनवेल, नवी मुंबई याठिकाणी वास्तव्य करत असताना, पहिल्या पतीने तिच्या नावाचा बनावट जन्म दाखला, आधारकार्ड अशी कागदपत्रे तयार करुन घेतली. त्यानंतर पहिल्या पतीने सोडल्यानंतर दुसरा पती विक्रम प्रकाश कदम (रा. वडगाव (शिरगाव), ता. कराड) याच्यासोबत वडगाव येथे अवैध्यरित्या वास्तव्य करुन पहिल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे वडगाव, ता. कराड या पत्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, एचडीएफसी बँकेचे बॅक खाते अशी कागदपत्रे तयार केले होते. त्याआधारे भारतीय नागरिक असल्याचे भासवून भारतात घुसखोरी करुन वास्तव्य करीत असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय जयसिंग धुमाळ यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून संशयित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सपोनि रविंद्र भोरे तपास करत आहेत.