झोळीची ‘एम्ब्युलन्स’! ९२ वर्षांच्या आजीला रस्त्याअभावी पायपीट करत रूग्णालयात केलं दाखल

प्रभात वृत्तसेवा
हिरडस मावळ – भोर तालुक्यातील म्हसर बुद्रुकमधील राखीचा माळ धनगर वस्ती येथील ९२ वर्षाच्या आजी सगाबाई विठ्ठल बर्गे यांना ताप, थंडी येऊन आजारी पडल्या. परंतु रस्त्याची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने चादरीची झोळी करून 2 किलोमीटर पायपीट करीत रस्त्यापर्यंत आणून तेथून खासगी वाहनाने त्यांना निगुडघर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.म्हसर बुद्रुक धनगर वस्ती येथे रस्त्याअभावी अनेक रुग्णांचे हाल होत असून त्यांना झोळी करून पायपीट करीत दवाखान्यापर्यंत आणले जात आहे.
सगाबाई विठ्ठल बर्गे यांना ताप आणि थंडी जाणवू लागल्यामुळे अशक्तपणा देखील जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना चालणे अशक्य झाल्यामुळे आजीचा नातू अजित बर्गे तसेच अजय शिंदे आणि सुनबाई कोंडाबाई बर्गे, आरती शिंदे यांनी झोळी करून आजीला दवाखान्यात आणले. उपचार करून पुन्हा घरी नेण्यात आले.
म्हसर बुदुक येथील ग्रामपंचायत सदस्य दिनेश शिंदे यांनी रस्त्यासंबंधी तहसीलदार, प्रांत, गटविकास अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना लिखित स्वरूपात प्रसारित केलेल्या वृत्तांची कात्रणे जोडून एक ते दीड महिन्यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. अजूनही निवेदनाची दखल गेली नसून निवेदनाची दखल घेऊन रस्त्याची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी सदस्य दिनेश शिंदे यांनी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.



