जिल्हा रुग्णालयात 20 बेडचा अतिदक्षता विभाग सज्ज

सातारा – करोनाच्या संभाव्य उपद्रवाची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य सुविधा सज्जता आहे का याची रंगीत तालीम क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयामध्ये घेण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सर्व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश दिले असून वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ आणि सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. खबरदारीच्या दृष्टीने अतिदक्षता विभागाचा वीस कॉटचा एक वार्ड सज्ज ठेवण्यात आला आहे. याशिवाय गरज पडल्यास महिला रुग्णालयाची इमारत किंवा त्यातील दोन दालने खबरदारीच्या उपायासाठी सज्ज ठेवण्यात येतील, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्यात वैद्यकीय उपकरणे आणि मनुष्यबळाच्या रंगीत तालमी अनेक रुग्णालयांमध्ये घेण्यात आल्या. तसाच आढावा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची उपलब्धता, विलगीकरण खाटांची क्षमता, ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा, आयसीयू व्हेंटिलेटर खाटा, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, आयुष डॉक्टर, अंगणवाडी सेविका, फ्रंटलाईन वर्कर इत्यादी मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आल्याचे डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
लसीकरण करून घेण्याचे आवाहन
जिल्हा रुग्णालयाचा अतिदक्षता विभागाचा एक कक्ष करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. अद्यापही जिल्ह्यामध्ये करोना संक्रमणाची कोणतीही भीती नाही. तरीही केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे डॉ. सुभाष चव्हाण त्यांनी सांगितले. भारत बायोटेकच्या नाकावाटे घेण्याच्या लसीची चौकशी केली असता डॉ. चव्हाण म्हणाले, “अद्याप यासंदर्भातील कोणतेही लेखी निर्देश राज्य शासनाकडून आलेले नाहीत. सध्या डीएसआयसी सेंटरमध्ये कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिनचे लसीकरण सुरू आहे. ज्यांचा दुसरा डोस घ्यावयाचा राहिला आहे त्यांनी तो तात्काळ पूर्ण करावा आणि नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.





