“डीजे’समोर नाचताना 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

भोपाळ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे डीजेसमोर नाचताना एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. समर बिलोरे असे या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या घरासमोरून दुर्गामूर्ती घेऊन जात असताना त्याने डीजेसमोर नाचायला सुरुवात केली. परंतु, तो अचानक जमीनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी आणि मोठा आवाज असल्याने लोकांचे समरकडे लक्ष गेले नाही. मृताच्या आईने आपला मुलगा जमीनीवर पडल्याचे पाहून मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. मृत मुलाला हृदयाशी संबंधित आजार होता. परंतु, आता तो बरा होता, असेही त्याच्या आईने सांगितले.
या घटनेबाबत सांगताना समरचे वडील म्हणाले की, डीजेचा आवाज खूप मोठा होता. अनेकदा बोलूनही डीजे थांबला नाही. याच दरम्यान माझ्या मुलाचा मृत्यू झाला. घटनेनंतर समरला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले.





