तामीळनाडूत कॉंग्रेसच्या वाट्याला ९ जागा; पुदुचेरीतील एकमेव जागाही लढवणार

चेन्नई -कॉंग्रेस आणि द्रमुक या मित्रपक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या जुन्याच फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार, तामीळनाडूत कॉंग्रेसच्या वाट्याला ९ जागा आल्या आहेत. त्याशिवाय, पुदुचेरीतील एकमेव जागाही कॉंग्रेस लढवणार आहे.
कॉंग्रेस आणि द्रमुक हे इंडिया या देशव्यापी आघाडीतील घटक आहेत. तामीळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकार आहे.
त्या राज्यातील मोठा पक्ष असल्याने जागावाटपाची सुत्रे द्रमुकच्या हाती होती. त्या पक्षाने मागील निवडणुकीवेळचा जागावाटपाचा फॉर्म्युला कायम ठेवण्याची भूमिका आधीपासूनच घेतली होती. त्यावर कॉंग्रेसनेही सहमती दर्शवल्याने दोन्ही पक्षांतील जागावाटप अंतिम झाले.
द्रमुकचे प्रमुख असणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत जागावाटप ठरल्याची घोषणा करण्यात आली. तामीळनाडूत लोकसभेच्या एकूण ३९ जागा आहेत. तामीळनाडूतील घडामोडीमुळे कॉंग्रेसने आतापर्यंत द्रमुकसह इंडियामधील ३ मित्रपक्षांसमवेतचे जागावाटप निश्चित केले.
याआधी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेशातील जागावाटपाची प्रक्रिया मार्गी लावली. त्याशिवाय, दिल्लीसह काही राज्यांत कॉंग्रेस आणि आपमध्ये हातमिळवणी झाली. आता महाराष्ट्र, बिहार आदी राज्यांत ती प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.





