नेपाळमध्ये हिमकडा कोसळल्यामुळे ९ जणांचा मृत्यू

काठमांडू : नेपाळमध्ये झालेल्या हिमकडा कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे ९ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन स्थानिक मदतनिसांचाही समावेश आहे. यातील पहिली घटना गौरीशंकर ग्रामीण महापालिकेच्या हद्दीमध्ये माऊंट यालुंग रि जवळ सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या हिमशिखरावर गिर्यारोहण करणारे ७ गिर्यारोहक बर्फाखाली गाडले गेले, असे पोलीस उपाधिक्षक ग्यान कुमार महातो यांनी सांगितले.
या गर्यारोहकांचे गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी संयुक्त बचाव मोहिम सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. या गिर्यारोहकांमध्ये नेपाळचे नागरिक असलेल्या दोघांसह इटलीचे पावलो कोक्को आणि मार्को डि मार्सेलो, कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनीच्या एका गिर्यारोहकाचाही समावेश आहे. नेपाळचे तिघे आणि फ्रान्सचे नागरिक असलेले अन्य दोघे, असे अन्य पाजजण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने काठमांडूच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेल्या अन्यचार गिर्यारोहकांना घटनास्थळावरून वाचवण्यात आले आहे.
हिमकडा कोसळण्याच्या दुसऱ्या एका घटनेमध्ये स्टेफानो फारोनाटो आणि अलेस्सानद्रो कापुतो हे इटलीचे दोन बेपत्ता झालेले गिर्यारोहक मृतावस्थेमध्ये सापडले आहेत. दिनांक २८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमध्ये हे दोघेही बेपत्ता झाले होते. या दोघांचे मृतदेह मंगळवारी ५,२४२ मीटर उंचीवर सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांसमवेत बेपत्ता झालेला वेल्टर वारालिऑन या इटलीच्या तिसर्या गिर्यारोहकाला वाचवण्यात यश आले आहे. मरण पावलेल्या गिर्यारोहकांच्या मृत्यूबद्दल नेपाळ पर्यटन मंडळाने दुःख व्यक्त केले आहे.


