ISIS terrorists : इसिसच्या ९ दहशतवाद्यांना इराणमध्ये फाशी

दुबई – इस्लामिक स्टेटच्या ९ दहशतवाद्यांना इराणमध्ये फाशी देण्यात आली आहे. २०१८ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर चालवलेल्या खटल्यात दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
इराणमधील सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवल्यानंतर या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आल्याचे इराणमधील न्यायपालिकेच्या मिझवान वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
देशाच्या पश्चिम भागात इराणच्या निमलष्करी रिव्होल्युशनरी गार्डशी झालेल्या चकमकीत तीन सैनिक आणि अनेक इस्लामिक स्टेटचे दहशतवादी मारले गेले होते. त्यानंतर अतिरेक्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
अतिरेक्यांच्या लपण्याच्या ठिकाणाला वेढा घातल्यानंतर एक मशीनगन आणि ५० ग्रेनेडसह लढाऊ शस्त्रांचा साठा जप्त केला असल्याचे वृत्तसंस्थेच्या बातमीमध्ये म्हटले आहे.
इराणमध्ये फाशीची शिक्षा सर्वात जास्त प्रमाणात दिली जाते. दर सहा तासांमध्ये सरासरी एका व्यक्तीला फाशी दिली जाते, असे इराण ह्युमन राईट्स या वकिली गटाचे संचालक महमूद अमीरी-मोघद्दाम यांनी म्हटले आहे. या दहशतवाद्यांवर कोणताही खटला चालवला गेला नव्हता, असा दावाही त्यांनी केला.
तसेच २०१८ च्या हल्ल्यानंतर ताब्यात घेतलेल्या ७ दहशतवाद्यांचा कोणताही ठावठिकाणा नसल्याचेही त्यांनी सांगितले. एकेकाळी इराक आणि सीरियाच्या मोठ्या भूभागावर इसिसचा ताबा होता. मात्र अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या सैन्याने इसिसचा पाडाव केला आहे.





