Ratnagiri-Sindhudurg : कोकणात फुलली ८०० स्वप्ने, ‘मैत्रक’च्या सेवायज्ञात रत्नागिरी-सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप
Ratnagiri-Sindhudurg : २७ शाळांमध्ये ८०० विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप

रत्नागिरी – आज कोकणच्या शाळांमध्ये निरागस स्वप्नाचा दिवस उजाडला. मैत्रक चॅरिटेबल फाउंडेशनने ॲड. प्रतिभा सोनटक्के यांच्या स्मरणार्थ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू २७ शाळांमध्ये ८०० विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप करून केवळ मदत नाही, तर माणुसकीचा एक जिवंत उत्सव साजरा केला.
ज्या क्षणी चिमुकल्यांनी आपली नवी दप्तरं हातात घेतली, त्या क्षणी वर्गात एकच जल्लोष उसळला. काहींच्या डोळ्यांत आश्चर्य, काहींच्या चेहऱ्यावर लाजरं हसू, तर काहींनी घट्ट आपल्या छातीशी दप्तरं धरली. तो क्षण पाहण्यासाठी मैत्रक परिवार गेल्या अनेक दिवसांपासून झटत होता आणि काल तो क्षण खरा झाला.
यावेळी मैत्रकचे अध्यक्ष नरेंद्र चिप्पा म्हणाले, आमचे बक्षीस तेव्हा मिळते, जेव्हा निरागस डोळ्यांत आम्हाला चमक दिसते. काल तीच चमक ८०० डोळ्यांत दिसली, आणि तीच आमची खरी ऊर्जा आहे. मैत्रकचा मूळ मंत्र आहे “Rejuvenate Humanity- माणुसकीला नवसंजीवनी देणे. आमचा ठाम विश्वास आहे की शिक्षण हाच उज्ज्वल भविष्याचा पाया आहे.
दरम्यान, सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी कोणतीही असो, प्रत्येक मुलाला शिकण्याची समान संधी मिळालीच पाहिजे. याच दृष्टीकोनातून मैत्रकने गेल्या दशकात स्कूल किट प्रोग्राम सुरू केला. या किटमध्ये केवळ साहित्य नसते, तर एका विद्यार्थ्याचे संपूर्ण शैक्षणिक विश्व असते.
सुरुवातीपासून या उपक्रमाने महाराष्ट्रातील अनुदानित नसलेल्या शाळांमधील आणि गरीब-गरजू विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक केंद्रांपर्यंत मदत पोहोचवली आहे. दरवर्षी हा प्रवास अधिक दुर्गम, अधिक वंचित भागापर्यंत पोहोचतो.
हा संपूर्ण उपक्रम प्रवीण साळुंके (ADG) यांच्या मार्गदर्शनाखाली व दिशानिर्देशानुसार पार पडला. या कार्यास श्रीमती दिघे मॅडम (DYSP), घुले (API) व त्यांच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य व सक्रिय मदत लाभली.
हेही वाचा:
UGC-NET: “मोदीजी, बघा तुमच्या NTA ने पुन्हा काय केलं?” ; UGC-NET मधील गोंधळावरून राहुल गांधींची टीका





