मुंबईत रेल्वेचा भीषण अपघात, ६ प्रवाशांचा मृत्यू; रेल्वे बोर्डाने तातडीने घेतला मोठा निर्णय

मुंबई : मुंबईत एक हृदयद्रावक रेल्वे अपघात घडला आहे. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून ६ प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडले. हा अपघात आज (९ जून) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला आहे आणि त्यामुळे संपूर्ण रेल्वे प्रशासन हादरले आहे.
नेमका कसा घडला अपघात?
दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान आज सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान लोकल आणि एक्सप्रेस एकमेकांना घासल्याचे समोर आले आहे. कल्याणहून सीएमएमटीसाठी निघालेली ८.३६ वाजताची लोकल दिवा ते मुंब्रा स्थनकादरम्यान दुसऱ्या पटरीवर धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला घासल्याने ही मोठी दुर्घटना घडली. यावेळी मोठा आवाज झाल्याने नागरिकही घाबरले होते.
दरम्यान, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी मुंबईकर लोकलने निघाले होते आणि गर्दीही प्रचंड होती. मुंब्रा-दिवा या स्थानकादरम्यान लोकल आणि ट्रेन एकमेकांना घासले. ज्यानंतर लोकलमधून ८ ते १० प्रवासी ट्रॅकवर पडले. यातील ६ जणांचा मृत्यू झाला असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या रेल्वेकडून या घटनेची माहिती घेतली जात आहे. Local Train |
घटनेत काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
रेल्वे बोर्डाने घेतला तातडीचा निर्णय
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी खरेदी होणाऱ्या सर्व नवीन लोकल ट्रेनमध्ये ‘ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिम’ असणार आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच 238 एसी लोकल ट्रेन खरेदी केल्या असून त्या सर्व गाड्या ऑटो डोअर क्लोजर यंत्रणेसह येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लोकलचा प्रवास किती सुरक्षित?
दररोज कोट्यवधी प्रवासी मुंबई लोकलचा वापर करतात. मात्र, दरवाजे उघडे राहणे, प्रचंड गर्दी, धक्काबुक्की यामुळे अशा घटना वारंवार घडताना दिसतात. ऑटो डोअर क्लोजर ही व्यवस्था लागू केल्यास अशा अपघातांना मोठ्या प्रमाणावर आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.





